सोयगांव तालूक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग आरक्षण सोडतीबाबत वंचितचा आक्षेप,आरक्षण बदलण्याची मागणी ---




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२६-- सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत बाबत बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी दि.२५ गुरुवारी तहसीलदार यांच्याकडे आक्षेप नोंदवला असून लोकसंख्येच्या योग्य निकषावर आरक्षण बदलण्यात यावे असे दिलेल्या आक्षेप अर्जात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत आक्षेप अर्ज सादर करत आहे. 

शासनाच्या संबंधित परिपत्रकातील तरतुदीनुसार (कलम ४.१.१), ज्या भागात किंवा प्रभागात अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाची लोकसंख्या शून्य आहे, अशा प्रभागांचाही उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चितीसाठी समावेश करण्याचे नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्ष धर्तीवर हा नियम अन्यायकारक ठरू शकतो. ज्या प्रभागात संबंधित प्रवर्गातील (SC) एकही नागरिक किंवा मतदार राहत नाही, तेथे तो प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवल्यास स्थानिक मतदारांवर आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांवर मोठा अन्याय होतो. करिता ज्या प्रभागात 'अ.जा.' (SC) प्रवर्गाची अजिबात लोकसंख्या नाही, त्या भागातील सदर प्रभागाचे आरक्षण रद्द करण्यात यावे, त्याऐवजी, ज्या भागात 'अ.जा.' (SC) किंवा इतर मागासवर्गीय विशिष्ट समाजाची प्रत्यक्ष लोकसंख्या अधिक प्रमाणात उपलब्ध आहे, त्या भागानुसार आणि लोकसंख्येच्या योग्य प्रमाणानुसार त्या-त्या प्रवर्गाची जागा आरक्षित करण्यात यावी. अशा पद्धतीने आरक्षणामध्ये योग्य तो बदल केल्यास लोकशाहीच्या खऱ्या उद्दिष्टाचे पालन होईल आणि स्थानिक समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळेल. अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन, शून्य लोकसंख्या असलेल्या प्रभागातील आरक्षण रद्द करावे आणि प्रत्यक्ष लोकसंख्येच्या वास्तववादी निकषानुसार सुधारित आरक्षण सोडत जाहीर करावी असे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी आक्षेप अर्जात म्हटले आहे. आरक्षण सोडत चा निर्णय कायम ठेवणार की बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments