राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरीजी ट्रस्ट यांच्यावतीने दिनांक 27 मे 2026 बुधवार कमला एकादशीनिमित्त रात्रभर भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्टचे महंत संन्याशी राजराजेश्वरी श्री आत्मारामगिरीजी महाराज यांनी दिली आहे.
सध्या या विश्वामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र विशेषता भजन स्पर्धेचे आयोजन अधिक प्रमाणात कोठेही केले जात नाही. त्यामुळेच श्री नर्मदेश्वर सेवाधाम येथे 27 मे 2026 बुधवार रोजी कमला एकादशी निमित्त रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत रात्रभर भव्य व धार्मिक वातावरणात या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5000 रुपये तर द्वितीय बक्षिस 3000 रुपये व तृतीय बक्षीस दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सहभागी भजनी मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही भजन स्पर्धा ठेवण्यामागे धार्मिक उद्देश असून त्यामुळे हरिनाम कीर्तनाचा प्रचार प्रसार होईल, संत परंपरेचे जतन होईल, युवकांना त्यामुळे अध्यात्मिक एक चांगली दिशा मिळेल, व गावोगावी खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर असणारे भजनी मंडळे यांनाही एक चांगल्या ठिकाणी भजने गाण्याची व अध्यात्मात तल्लीन होण्याची एक संधी मिळेल. इतर लहान मुलांना तरुणांना भजन गाण्याची, टाळ मृदंग हार्मोनियम वाजवण्याची एक आवड निर्माण होईल. आकर्षण वाढेल. त्यातून लहान मुलांना धार्मिकतेकडे ओढ निर्माण होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या भजन स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात आले असल्याचे महंतआत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.
दि.27 मे 2026 बुधवार रोजी कमला एकादशी निमित्त रात्रभर ही भजन स्पर्धा चालणार असून 28 मे 2026 गुरुवार रोजी द्वादशीला सकाळी दहा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.या स्पर्धेत प्रत्येक भजनी मंडळाला दहा ते पंधरा मिनिटांचे वेळ दिला जाईल, भजने ही संत साहित्य, धार्मिक विषयाला अनुसरून केले जातील. चित्रपटातील गीते यास मनाई राहील. भजनी मंडळात आठ ते दहा सदस्य असावेत. पारंपारिक टाळ मृदंग हार्मोनियम या वाद्यांचा वापर हवा .तसेच वेळेचे काटेकोर बंधन पाळण्यात येईल व परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील असे नियम व अटी भजनी मंडळ स्पर्धकांना राहणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या भजनी मंडळांनी 10 मे 2026 पर्यंत नाव नोंदणी करावी. या भजन स्पर्धेत अधिकाधिक भजनी मंडळांनी उत्साहाने सहभागी व्हावे. असे आवाहान श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरीजी ट्रस्ट पिंपरी निर्मळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
0 Comments