मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनीही साई पालखीत घेतला सहभाग!
शिर्डी( राजकुमार गडकरी)-
श्री साईबाबा संस्थानतर्फे श्रीरामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून पायी येणाऱ्या साईभक्तांच्या पालखी सोहळ्यांचे नाशिक–सिन्नर रोडवर उत्साहात स्वागत करण्यात आले. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी शिर्डीला येणारे या साई पालखी मंडळांना भेट देत साई पालख्यांचे स्वागत केले. भाविकांशी , साई पदयात्रींशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परंपरा जपत मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालखी सोहळ्यात काही अंतर पदयात्रींसमवेत पायी चालत भक्तिभावाचा अनुभव घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व त्यांच्या पत्नी सौ. वंदना गाडिलकर यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी साईभक्तांच्या सेवेसाठी संस्थान सदैव तत्पर असल्याचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी श्री साईबाबा संस्थानतर्फे पालखी पदयात्रेकरिता विविध ठिकाणी कीर्तन / प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, पदयात्रींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची सुविधा तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे हजारो पदयात्रींना मोठा दिलासा मिळत आहे.
0 Comments