रामनामामुळे दगड पाण्यात तरंगतात, तर हा मनुष्य देह या भव सागरात तरंगण्यासाठी राम नामाची कास धरा!प्रभू श्रीरामाला आदर्श मानणारे ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज हे लाभले नसते तर आपण कुठेही वाहवत गेलो असतो--ह भ प संजयजी महाराज जगताप

शिर्डी (प्रतिनिधी)-ज्यांच्या नामामुळे दगड पाण्यात तरंगतात, अहिल्याशिळा ज्यांच्या चरणस्पर्शाने पुन्हा मानव रुपात येते. अशा राम नामाची कास धरली तर नक्कीच हा मानव देह या भवसागरातून तरुण जाईल असे सांगत श्री प्रभू रामाचा आदर्श घेत अनेकांचे प्रपंच उध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे काम ब्रह्मलीन श्री नारायणगिरीजी महाराज यांनी केले.जर आपल्याला श्री संत नारायणगिरीजी महाराज लाभले नसते तर आपण केव्हाच कुणीकडेही वहावत गेलो असतो. त्यांचेही धार्मिक कार्य महान आहे. असे निरूपण विविध दाखले देऊन ह भ प श्री संजयजी महाराज जगताप 
(भऊरकर )यांनी आपल्या कीर्तनातून केले.

  श्री संत नारायणगिरीजी महाराजांचा पंचक्रोशी आश्रम, डवाळा येथे 29 वर्षापासून श्रीराम नवमी उत्सवानिमित्त पंचदिनी अखंड सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.याही वर्षी रविवार दि. २२.३.२०२६ रोजी सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सायंकाळी ह भ प श्री संजयजी महाराज जगताप यांच्या सुश्राव्य अशा अमृतवाणीतून झाली. ज्ञानाविरहित गोष्टीं न सांगाव्या अशी कीर्तन मर्यादा आहे. आपल्या कीर्तनातून विनोद व प्रापंचिक गोष्टी न सांगता आपल्या कीर्तनातून अध्यात्मिक उपदेश करावा असे सांगितले आहे. त्याप्रमाणेच कीर्तनाचे सर्व संकेत पाळत अध्यात्म व ब्रह्मलीन श्री संत नारायणगिरीजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपल्या कीर्तनातून‌ नेहमी भर देणारे व ब्रह्मलीन श्री सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य असलेले श्री ह भ प श्री संजयजी महाराज यांची मोठी ख्याती आहे. अशा‌ हभप संजयजी महाराज जगताप यांनी येथेही आपल्या कीर्तनात ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर व व्यावहारिक जीवनात आपण ज्याच्याकडे गेलो. आपल्याला त्याची स्तुती गुणगान करणे हेच आपले काम असते आणि म्हणूनच आज येथे राम दरबारात राम नवमी पंच सप्ताहात कीर्तन करीत असताना आदर्श पुत्र, भाऊ,पती,राजा या सर्व आदर्शांचा संगम असणारे असे भगवान पुरुषोत्तमाचचा गुण गौरव करणाऱ्या अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील 

तारी ऐसे जड ।* 
उदकावरी जो दगड ॥१॥*
तो हा न करी तें काई ।* 
कां रे लीन व्हा ना पायीं ॥२॥*
सीळा मनुष्य झाली ।* 
ज्याच्या चरणाचे चाली ॥३॥*
वानरां हातीं लंका ।* 
घेवविली म्हणे तुका ॥४॥

 हा अभंग येथे कीर्तनासाठी घेतला व या कीर्तनातून त्यांनी जमलेल्या श्रोत्यांना विविध दाखले देत मंत्रमुग्ध केले.हभप संजयजी महाराज जगताप यांनी आपल्या कीर्तनात मुंगीचा राजा व राजाचा रंक करण्याचे सामर्थ्य हे भगवान परमात्मा व संतांमध्ये असते. असे सांगून संतांचा महिमा सांगितला आणि आपल्याला ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज लाभले नसते तर आपण केव्हाच कुठे वाहावत गेलो असतो याचा पत्ताच लागला नसता .हे सांगताना त्यांनी अनेक बे- तालामध्ये असणाऱ्यांना तालामध्ये आणण्याचे काम करून अनेक जणांचे प्रपंच उध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे काम श्री ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांनी केल्याचे अनेक दाखले दिले.‌ अशा या सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या हस्तेच झालेले हे भगवान श्रीरामांचे मंदिर असल्याचे त्यांनी सांगून आता हा आश्रम खूप भव्य दिव्य झाला असून ही सर्व त्यांचीच कृपा असल्याचे सांगितले व त्यांनी स्थापित केलेल्या भगवान श्रीराम मंदिराच्या कामाचा जीर्णोद्वार व्हावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 भगवान श्रीरामांचे चरित्र हे आपुलकीचे व सुटसूटीच्या असून महाभारत हे मानवी समाजाला समजणे गुंतागुंतीचे असल्याने ते ग्रामीण भाषेत गोंधळाचे त्यांनी सांगून आपल्याला फक्त रामायण माहिती आहे. मात्र त्या रामायणाचे अनेक प्रकार असून ते फारसे जणांना माहित नाही असे त्यांनी सांगितले आणि हा मानव देह तरुण जाण्यासाठी आपल्याला रामायणाचीच कास धरावी लागेल असे त्यांनी सांगितले. 
 अशा या भगवान श्रीरामांची देवाधिदेव भगवान श्री शिवशंकर हे देखील सातत्याने स्मरण करतात. नव्हे नव्हे त्यांनी केलेले विष प्राशन देखील राम नावाने दूर झाले होते आणि म्हणून भगवान श्रीरामांची अधिकाधिक सेवा घडावी या उद्देशाने रामायणात त्यांनी रामाचे भक्त म्हणून हनुमानाच्या रूपाने अवतारीत झाले व त्यातूनच भगवान श्रीराम विजयी झालेचेही त्यांनी सांगितले. तसेच महाबलाढय रावणाविरुद्ध लढताना त्यांनी ना देवाची ना दानवाची ना मानवाची तर त्यांनी वानरांची कशी मदत घेतली हे यावेळी पटवून सांगितले.त्यांनी आपल्या कीर्तनात आपल्या भागाचे नेते आदरणीय ॲड श्री प्रमोद दादा जगताप यांच्याबरोबरच भऊर गावातील सर्वच राजकीय नेते हे‌ सप्ताह दिंड्या अशा सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदतीसाठी तत्पर असतात. असेही त्यांनी सांगितले 
 या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात हजर होते .तसेच कीर्तनात गायनाचार्य सर्वश्री रवी भाऊ शितोळे, सदाभाऊ निर्मळ, नानासाहेब लांडे यांच्या गायनाचाही श्रोत्यांनी विशेष असा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments