राजुरी (वार्ताहर)विजय बोडखे
युवा खेळाडूंची शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडा गुणांना शास्त्रोक्त पद्धतीने वाव देण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या क्रीडा फिजिओथेरपी विभागातर्फे 'फिटचेक ३६०' या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा फायदा पहिल्या सत्रात १२० खेळाडूंनी घेतला.
या मोहिमेअंतर्गत खेळाडूंची केवळ शारीरिकच नव्हे, तर हृदय-श्वसन, न्यूरोमस्क्युलर, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली अशा सर्वंकष बाबींची तपासणी केली जात आहे. "हालचालींमधील अचूकता सुधारणे आणि दुखापतींचे प्रमाण कमी करून दीर्घकालीन क्रीडा विकास साधणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे," असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. के. सिन्हा यांनी केले.
क्रीडा फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांनी सांगितले की, या तपासणीमुळे खेळाडूंना त्यांच्या शरीरातील कमकुवत दुवे ओळखून त्यावर काम करणे सोपे होईल. या उपक्रमासाठी ध्रुव अकॅडमी आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे, क्रीडा समन्वयक गिरीश टोकसे व डॉ. सुनील बुलार यांचे विशेष सहकार्य लाभले.
'फिटचेक ३६०' हा उपक्रम केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या उपक्रमाचा लाभ घेऊन स्वतःला अधिक सक्षम बनवावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments