टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री शंभू महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील महादेव मंदिर हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असून पहाटे पासूनच शंभू दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे ५.३० ते सकाळी ८ पर्यंत गंगाजल रुद्र अभिषेक पार पडला. तदनंतर सकाळी ९ ते १० या वेळेमध्ये ह भ प नानासाहेब माने, कु. राज किशोरी माने, चि. प्रयागराज माने यांच्या सुमधुरवाणीतून सुगम संगीत भजनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. तदनंतर १० ते १२ या वेळेमध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सचिन महाराज ढोले(छ. संभाजीनगर) यांच्या सुस्राव्यवाणीतून कीर्तनाचा आस्वाद भाविकांनी घेतला. यानंतर उपस्थित सर्व भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळी पत्रकार दिलीप लोखंडे यांकडून राजगिरा लाडूचा प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच अ. भा. श्रीकृष्ण गोपाळ सामाजिक संघटनेद्वारे भाविकांना खिचडी व केळी वाटप करण्यात आली.
सर्व भाविकांना शिस्तीमध्ये व शांततेत प्रसाद वाटप करण्यात आले. संयोजकांनी कार्यक्रमाचे उत्तम रित्या नियोजन केले. त्यास गावातील तरुण युवक मंडळ, महिला मंडळ, वस्तीगृहातील विद्यार्थी यांनी नियोजनासाठी परिश्रम घेऊन साथ दिली. कार्यक्रमासाठी कारभारी चांडे, प्रकाश नाईक, महादेव यात्रा कमिटी, श्रीराम पायी दिंडी सोहळा समिती, श्री साईबाबा पायी दिंडी सोहळा समिती, ताई प्रतिष्ठान, पत्रकार सेवा संस्था, टाकळीभान व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ टाकळीभान यांचे अनमोल सहकार्य लाभले व आयोजकांच्या वतीने सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी पत्रकार दिलीप लोखंडे मित्र मंडळाच्या वतीने महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी पी एस आय, दिलीप मुंडलीक,हे, का, नवनाथ बर्डे, यांनी उपस्थित राहून बंदोबस्त ठेवला.
0 Comments