दिलीप शिंदे
सोयगाव दि.२१-- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यालयात धूळ साचली असून अस्वच्छता असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.तर कार्यालयाबाहेर गेट जवळ टाकण्यात आलेला मुरुम पसरविला नसल्याने महिला उमेदवार विशेषतः बहुजन समाज पक्षाच्या दिव्यांग असलेल्या महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याने निवडणूक विभागाच्या नियोजनावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकी करिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा उपयोग केला जात आहे. प्रशासकीय इमारतीत धूळ साचलेली असून त्याची साफसफाई न करता निवडणूक विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दि.२१ बुधवार हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. तीन गट व सहा गण साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात एकच गर्दी केली होती. उमेदवारांना कार्यालयात ये -जा करण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी निवडणूक कार्यालयाच्या बाहेर गेटजवळ मुरुम टाकण्यात आला होता. टाकलेला मुरुम पसरविण्याची तसदी देखील निवडणूक विभागाने घेतली नाही. महिला उमेदवारांना विशेषतः बहुजन समाज पक्षाच्या आमखेडा गटाच्या दिव्यांग असलेल्या महिला उमेदवार उर्मिला संदीप इंगळे यांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कार्यालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. यामुळे उमेदवारांसह उपस्थित नागरिकांमधून निवडणूक विभागाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिव्यांगासाठी कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कार्यालयात असलेली धूळ ची साफसफाई न केल्यास पाय घसरून पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.निवडणूक विभाग साफसफाई करणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments