लोणी बुद्रुक येथे केंद्रीय मंत्री चौहान यांच्या उपस्थितीत ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन



लोणी दि. ३१ :- प्रतिनिधी 

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान लोणी बुद्रुक येथे आयोजित ‘विशेष ग्रामसभे’ला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या 'विकसित भारत – जी राम जी' (VB-GRAM G) विधेयकाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभी, अर्थात गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामविकासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर केंद्र सरकारने नुकत्याच संपन्न झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विकसित भारत जी राम जी विधेयक मंजूर केले आहे.केंद्र सरकारने नव्या स्वरूपात आणलेल्या योजनेची माहीती ग्रामीण भागात होण्याच्या दृष्टीने ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.सहकार चळवळीचे केंद्र म्हणून ओळख असलेल्या लोणी बुद्रुक गावातील विशेष ग्रामसभेत केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहून ग्रामसभेला संबोधित करणार आहेत.लोणी बुद्रुक गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

'विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन - ग्रामीण' अंतर्गत जुन्या मनरेगाच्या योजनेत बदल करून १०० दिवसां ऐवजी आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवस रोजगाराची हमी व पेरणी-कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळावेत, यासाठी शासकीय कामात ६० दिवसांच्या 'हंगामी विरामाची' (Seasonal Pause) तरतूद, योजनेतील पारदर्शकता आशा महत्त्वपूर्ण विषयांवर या सभेत विचारमंथन होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

या ऐतिहासिक ग्रामसभेच्या नियोजनाचा आढावा जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.या ऐतिहासिक ग्रामसभेस उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी मंत्री चौहान संवाद साधून ग्रामीण विकासाच्या संकल्पना अधिक सविस्तरपणे विषद करतील.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष ग्रामसभेचे कामकाज व मान्यवरांचे मार्गदर्शन समाजमाध्यमाद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

*****

Post a Comment

0 Comments