शिर्डी (राजकुमार गडकरी)- परंपरा, मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवणाऱ्या राहता तालुक्यातील सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी शाळेत दोन दिवस चाललेल्या रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट डिझाइन आणि Arduino प्रोग्रामिंग प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीस नवी दिशा मिळाली.
८४ वर्षांच्या गौरवशाली सोमैया विद्याविहार ट्रस्ट यांच्या शिक्षण परंपरेच्या निमित्ताने, मुंबई येथील के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ए-आई रोबोटिक सेल तर्फे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना भविष्यातील कौशल्यांनी सज्ज करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
या प्रशिक्षणामध्ये सर्किट डिझाइन, सेन्सर्सचे कार्य, रोबोट्सची रचना, तसेच सूक्ष्म-नियंत्रक (Arduino) च्या मदतीने विविध प्रोजेक्ट्स तयार करत विद्यार्थ्यांनी कुतूहल, समस्या-निवारण क्षमता आणि टीमवर्क यांचे उत्तम प्रदर्शन केले.
सोमैया विद्याविहार मुंबई व्यवस्थापनाने रोबोटिक्सचे प्रशिक्षण १२ वर्षांपूर्वीच सुरू केले होते, त्यावेळी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) अस्तित्वातही नव्हते. आज NEP-2020 जे ‘एक्सपेरिमेंट बेस्ड लर्निंग’ आणि ‘कौशल्याधारित शिक्षण’ यांवर भर देते, सोमैया विद्याविहार व्यवस्थापनाची शिक्षणातील दूरदृष्टी किती पुढारलेली आहे. हेच यावरून दिसून येते.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आलेले बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) विभागातील विद्यार्थी पुष्प मारू, केसा सय्यद, नव्या प्रभू, मंथन जंत्रे, अनंत जैस्वरा, अंशू मानिया आणि पल्लवी छावडा यांनी विद्यार्थ्यांना उत्कटतेने व समर्पणाने मार्गदर्शन केले.
उपक्रमानिमित्त आलेल्या प्रशिक्षणाच्या आयोजिका डॉ. वैशाली वाढे यांच्या मते
“सोमैया व्यवस्थापनाची ही परंपरा केवळ शिक्षणापुरती मर्यादित नाही तर हे विद्यार्थ्यांना सामाजिक भान आणि तंत्रज्ञानाची जोड देणारे परिवर्तनाचे मॉडेल आहे.”
0 Comments