शिर्डी (प्रतिनिधी)-श्री साईबाबांच्या मंदिरात घडलेला प्रामाणिकतेचा एक उल्लेखनीय प्रसंग संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेची विश्वसनीयता पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे. दि. ११ डिसेंबर रोजी श्री साईबाबांची धूप आरती संपल्यानंतर मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांना एक अनोळखी बॅग आढळून आली.
चौकशीत संबंधित बॅग कोणत्या साई भक्तांची असल्याचे न कळल्याने त्यांनी ती बॅग विना विलंब संरक्षण कार्यालयात जमा केली. पडताळणी दरम्यान बॅगेमध्ये १०,००० (USD) अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय मुल्यांकन अंदाजे रु. ९,००,०००/- व पासपोर्ट आढळून आले. पासपोर्टवरील “मोहित धवन (USA)” या नावानुसार त्वरित अनाउन्समेंट करण्यात आली. काही वेळातच श्री साईभक्त श्री मोहित धवन हे संरक्षण कार्यालयात आले. आवश्यक पडताळणीनंतर संबंधित साईभक्त यांना संपूर्ण रक्कम व पासपोर्ट सुरक्षितपणे परत देण्यात आले. आपली महत्त्वाची कागदपत्रे व मोठी रक्कम परत मिळाल्यामुळे श्री साईभक्त मोहित धवन यांनी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे मनःपूर्वक कौतुक केले.
श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा टीम भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच तत्पर आहे. त्यांना महत्त्वाचे सहकार्य मिळते ते संस्थानच्या सीसीटीव्ही विभागाकडून, जे संपूर्ण मंदिर व परिसरावर २४×७ डिजिटल देखरेख, गर्दी नियंत्रण, हरवलेल्या वस्तूंबाबत जलद माहिती, संशयास्पद हालचालींवरील तात्काळ अलर्ट इत्यादी माध्यमातून संरक्षण विभागाला अखंड मदत पुरवते. या समन्वयात्मक कार्यपद्धतीमुळे सुरक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता, विश्वास आणि कार्यक्षमता निर्माण झाली आहे.
“आमचे प्राथमिक ध्येय म्हणजे भाविकांची संपूर्ण सुरक्षितता. सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही विभागाचा समन्वय हा संस्थेच्या सुरक्षा प्रणालीचा मजबूत पाया आहे. आजच्या घटनेने आमच्या मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे.” असे प्रतिपादन करुन संरक्षण अधिकारी श्री. रोहिदास माळी यांनी सुरक्षा विभागातील सर्व कर्मचा-यांचे कौतुक केले. तर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले, “सुरक्षा विभाग कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता व प्रामाणिकता ही श्री साईबाबांच्या सेवाभावाच्या शिकवणुकीशी पूर्णतः सुसंगत आहे. सुरक्षा कर्मचारी श्री. कृष्णा कुलकर्णी यांनी केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अशा घटनांमुळे संस्थेवरील भाविकांचा विश्वास अधिकाधिक दृढ होतो.”
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. अशा घटनांमुळे श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा व्यवस्था देश-विदेशातील भाविकांमध्ये अधिक विश्वासार्ह ठरत असून, “सेवा, सुरक्षितता आणि प्रामाणिकता” या तीन स्तंभांवर संस्थानची प्रतिष्ठा अधिक दृढ होत आहे.
0 Comments