लोणी (प्रतिनिधी ) ज्ञानेश्वर साबळे
लोणी बुद्रुक : श्री स्वामी समर्थ सेवा,आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) लोणी बुद्रुक येथे यावर्षी श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य व दिव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नामजप, विविध यज्ञ-याग तसेच दत्त जन्मोत्सवाचे विशेष सोहळे असा अध्यात्ममय उत्सव रंगणार आहे.
या धार्मिक सप्ताहाची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी सकाळी मंगलमुखी मंत्रोच्चार, दीपप्रज्वलन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीने करण्यात आली. दिंडोरी प्रणित परंपरेनुसार या केंद्रात दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असून यंदा अधिक दिव्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सप्ताहाच्या दरम्यान केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ नामजप, तसेच वीणा वादन आणि प्रहर सेवा यांचे दिवसभर सत्र आयोजित केले आहे. ‘श्री गुरुचरित्र’ आणि ‘स्वामी चरित्र’ हे दोन्ही ग्रंथ परम पवित्र मानले जातात. या ग्रंथांचे अखंड पारायण ऐकल्याने अध्यात्मिक उन्नती, मन:शांती आणि जीवनातील अडथळे दूर होतात, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे परिसरातील अनेक साधक भक्तांनी या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.
यज्ञ-यागांच्या विभागात यावर्षी अधिक विस्तृत होम–हवन कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यात गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग यांसह विविध शास्त्रोक्त होम संपन्न होणार आहेत. यज्ञधुरिण ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांनी परिसरात अध्यात्मिक वातावरण अधिक पवित्र होणार असून भाविकांना प्रत्यक्ष होम-हवनाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. या यागांमुळे वातावरण शुद्ध होते, मानसिक आणि आत्मिक बल प्राप्त होते तसेच कुटुंबाच्या कल्याणासाठी मोठा लाभ होतो, असे केंद्राचे सेवेकरी सांगतात.
या संपूर्ण अध्यात्मिक सप्ताहातील विशेष आकर्षण म्हणजे श्री दत्त जन्म उत्सव, जो दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३९ वाजता मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. दत्ताभिषेक, महापूजा, नामस्मरण, आरती आणि प्रसाद वितरण असा दिवसभर कार्यक्रम राहणार आहे. या दिवशी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या असून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सप्ताहाची सांगता दि. ५ डिसेंबर रोजी होणार असून सकाळी १०:३० वाजता महाआरती, महाप्रसाद आणि सत्संगाने उत्सवाची सांगता पार पडणार आहे. सेवेकरी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून संपूर्ण आठवडा अध्यात्ममय वातावरणात पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
0 Comments