सोयगाव आगाराच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व चालकाच्या केबिन मधून प्रवाशांची धोकादायक वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष..



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०७-- राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगाराच्या बसगाड्या मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दि.०६ सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आला. परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यावर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभाग या बसगाड्या वर कार्यवाही का करीत नाही असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
 दरम्यान सोयगाव आगाराची दुपारी दीड वाजता सुटणारी सोयगाव-बनोटी एम एच १४ बीटी २५३७ या बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त व चालकाच्या कॅबिन मध्ये शालेय विद्यार्थिनी व प्रवाशी अक्षरशः कोंबले व काही प्रवासी जागे अभावी खालीच राहिल्याचा धक्कादायक प्रकार सोयगाव बस स्थानकावर उघडकीस आला आहे. कॅबिन मध्ये बसलेल्या प्रवाशांमुळे चालकास वाहकाची बाजू दिसत नाही व प्रवाशी जवळ बसले असतांना मन विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या अशी प्रवाशी वाहतुक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. बसगाड्यांचे अनेक अपघात झाले असून यात अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. कायदा सर्वांना समान असून देखील परिवहन महामंडळाच्या बस गाड्यावर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभाग का कारवाई करीत नाही हे मात्र निरुत्तरित आहे.पैसे वाचावे यासाठी मात्र सर्वसामान्य नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे. 

चौकट-- छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभागाकडून  खाजगी वाहनांवर कार्यवाही केली जाते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त जीवघेणी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर कार्यवाही करीत नसल्याने कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या प्रादेशिक परिवहन विभाग राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर कार्यवाही करणार की फक्त बघायची भूमिका घेऊन गोरगरीब प्रवाशांचा जीव टांगणीला लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments