आढावा बैठकीकडे पालकमंत्र्यांनी फिरवली पाठ, समस्या मांडण्यासाठी उपस्थित असलेले शेतकरी व नागरिकांकडून संताप,--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२५-  पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांनी दि.२५ गुरुवारी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांनी संताप व्यक्त केला होता.तर पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी भाजप पदाधिकारी तहसील कार्यालयात उपस्थित होते. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी तहसील कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याने पालकमंत्री आढावा बैठकीला थांबणार नाही अशी चर्चाच तहसील कार्यालय परिसरात सुरू होती. पालकमंत्र्यांनी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला पाठ फिरवल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला होता. या प्रकारामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. तर शासकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.

       याबाबत सविस्तर माहिती अशी, सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय शिरसाट हे दि.२५ गुरुवारी कन्नड - सोयगाव  मतदारसंघात झालेल्या ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ना. शिरसाट हे सोयगाव दौऱ्यावर होते.दुपारी २:०० वाजता तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहणार होते. दुपारी एक वाजेपासून शासकीय अधिकारी आढावा बैठकीसाठी तहसील कार्यालयात तळ ठोकून उपस्थित होते.जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता,वन्यजीव (अजगर), वन्यप्राण्यांच्या मृत्यू मध्ये झालेली वाढ, तालुका आरोग्य विभागाचा मनमानी कारभार,शासकीय कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नाही,स्वच्छतेचा प्रश्न,चोरटी गौणखनिज वाहतूक, शहरासह तालुक्यात सुरू असलेले अवैधधंदे, घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यास तहसीलदारांची उदासीनता,शेतकऱ्यांचे फेरफार यासह अनेक समस्यांच्या तक्रारी करण्यासाठी शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. तहसीलदार मनिषा मेने - जोगदंड यांच्या वाहन सायंकाळी ६:०० वाजता तहसील कार्यालयाकडे वळले, त्यांच्या मागे असलेला पालकमंत्र्यांचा ताफा मात्र तहसील कार्यालयासमोरून सरळ निघून गेला. आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली होती. पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता तर समस्यांच्या तक्रारी  करणाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता.

 चौकट: पालकमंत्री ना. संजय शिरसाट यांच्या स्वागतासाठी  भाजपचे पदाधिकारी तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभे होते.शिवसेनेचेच असलेले पालकमंत्री यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी उपस्थित नव्हते.त्यामुळे पालकमंत्री सोयगावला थांबणार नाही अशी पूर्वकल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असावी त्यामुळे ते तहसील कार्यालयाकडे फिरकलेच नाही.स्थानिक ठिकाणी भाजप व आमदार अब्दुल सत्तार यांचे यांच्यात असलेला दुरावा तालुका ओळखून आहे. पालकमंत्री हा पूर्ण जिल्ह्याचा पालक आहे. मात्र झालेल्या या प्रकारामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments