येवला तालुक्यातील अंदरसुल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने अगोदर पारंपारिक प्रथे प्रमाणे येथे ह भ प संजयजी महाराज जगताप, हभप रामनाथ महाराज गारखेडकर, यांच्या हस्ते धर्म ध्वजाचे ध्वजारोहण मोठ्या उत्साहात व विधिवतपणे करण्यात आले. तसेच परमपूज्य भास्करगिरीजी महाराज अंदरसुलकर यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसमोर मार्गदर्शन करताना ह भ प संजय जी महाराज जगताप म्हणाले की, हिंदू धर्मात भगव्या धर्म ध्वजाला खूप महत्त्व आहे, म्हणूनच प्रत्येक मंदिर, दिंड्या पालख्या ,सप्ताह आदी विविध धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी भगवा ध्वज असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, उभारला ध्वज तिन्ही लोकांवरी! ऐसा चराचरी कीर्ती याची!! असा हा धर्म ध्वज केवळ एक रंगीत कापड नसून तो हिंदू संस्कृती धर्म आणि हिंदू साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातून धार्मिकता दिसते. सर्वजण धर्म ध्वजापुढे नतमस्तक होत असतात. अशा या धर्म ध्वजाचे ध्वजारोहण आज झाले आहे. असा हा मोठा आनंदाचा उत्सव आज येथे अंदरसुल ग्रामस्थांच्या वतीने साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे येथे अखंड हरिनाम सप्ताह होत असून त्यानिमित्ताने हे ध्वजारोहण संपन्न झाले आहे. अंदरसुल ही ऐतिहासिक ,धार्मिक दृष्टीने महत्त्वाची नगरी आहे. येथे श्री अगस्ती ऋषींनी स्थापन केलेले श्री नागेश्वर महादेव मंदिर हे पुरातन व प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी येथे बारा वर्षे तपस्या केली. तसेच अंदरसुल येथे योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज हयात असताना स्वतः त्यांच्या उपस्थितीत सन 1866 ला सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला होता. येथे चार दिशेला चार हनुमानाचे मंदिर आहे. तसेच पुरातन असे श्री विठ्ठल मंदिर आहे. अनेक मंदिरे येथे असून येथील ग्रामस्थांनी या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.असे धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे हे गाव असून दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्त कीर्तन महोत्सव व मोठा धार्मिक सोहळा उत्सव येथे संपन्न होत असतो व या उत्सवाचा खऱ्या अर्थाने ध्वजारोहण करून शुभारंभ होत आहे. येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह च्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे ग्रामस्थांच्या वतीने आपण आवाहन करतो असे यावेळी हभप संजयजी महाराज जगताप म्हणाले. यावेळी उपस्थित महाराजांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला समस्त अंदरसुल ग्रामस्थ, तरुण मंडळ, भजनी मंडळ, वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments