लोहगाव ( वार्ताहर)
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) वर्ग आणि इंटरॅक्टिव्ह बोर्डचे उद्घाटन प्राचार्य विनायक मेथवडे व प्राचार्य अलका आहेर, देवेश आहेर आणि शितलताई बागुल यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य अलका आहेर, देवेश आहेर, शाहिस्ता शेख यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व विशद केले. प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, बदलत्या शिक्षण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे असून रयत शिक्षण संस्थेने सर्वात अगोदर या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. भविष्यात नोकरी व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान काळाची गरज असून जीवन समृद्धीसाठी विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा. इंटरॅक्टिव बोर्ड ही अध्ययन अध्यापन प्रक्रियेत पर्वणी ठरणार असून या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून अधिकचे ज्ञान आत्मसात करावे, असे सूचित केले. याप्रसंगी संजय डुबे, विठ्ठल म्हसे, दीपक धोत्रे, सुवर्णा भोर, प्रियंका म्हस्के, विश्वास मोहिते, सागर निगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर शरयू खर्डीकर यांनी आभार मानले.
0 Comments