लोहगाव (कोडीराम नेहे )
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असणाऱ्या व दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढी कामिका एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी माता व योगीराज संत चांगदेव महाराज समाधी स्थळ येथे मोठी यात्रा भरत असून यावर्षी सोमवार 21 जुलै 2025 रोजी येथे भव्य यात्रा भरणार आहे .
अनेक छोट्या मोठ्या दिंड्या व भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असून पुणतांबा हे भाविकांनी गजबजले आहे. राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा गावाला मोठा इतिहास आहे.गाव शालीवाहन काळात अस्तित्वात होते. पुण्यस्तंभ आणि तांबीलिंदनापूर ही गावे मिळून पुणतांबा अस्तित्वात आले असे बोलले जाते. श्रीक्षेत्र
पुणतांब्यात सोळा मारुती मंदिरे, प्रसिद्ध पुरातन स्वयंभू देवी मूर्ती आहे. सहा महादेव मंदिरे, तीन विठ्ठल मंदिरे, दोन दत्त मंदिरे व एक लक्ष्मी-नारायण मंदिर आणि प्रसिद्ध योगीराज संत चांगदेव महाराज समाधी मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर व शिवराम दुमल यांनी बांधलेले घाट आहेत. येथे पवित्र गोदावरी नदी दक्षिण उत्तर वाहते .त्या किनारी हि अनेक मंदिर आहेत. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी श्री काशी विश्वनाथ हे महादेवाचे मंदिर लाल दगडात बांधलेले आहे. श्री क्षेत्र पुणतांबा येथे
१४०० वर्ष जगलेल्या चांगदेव महाराज यांचे मंदिर हे येथील मुख्य मंदिर आहे. दर शंभर वर्षांनी संत चांगदेव वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करीत आणि पुणतांबा हे चौदावे ठिकाण आहे. जेथे त्यांनी संजीवन समाधी घेतली, असे म्हटले जाते. एक आख्यायिका अशी आहे की, संत चांगदेवांना आपल्याकडील असलेल्या शक्तीचा गर्व होता. ते वाघावर आरूढ होऊन व हातात सर्प चाबुक धरून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरवले. ते आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे दृष्य बघून चांगदेवांचे गर्वहरण झाले. त्यांनी त्या भावंडासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागितली. अशी कथा आहे.
येथील श्री योगीराज संत चांगदेव महाराजांचे हे मंदिर १७ व्या शतकात बांधण्यात आले. मंदिर जरी जुने असले तरी त्याची रचना साधी आहे. मंदिराच्या खालील भागात विठ्ठल - रखुमाई यांच्या पूर्वाभिमुख मूर्ती असून समोर मंडप आहे. त्याचे १० लाकडी खांब आहेत. छतावरती पन्हाळी पत्रे आहेत व ते चारही बाजूंनी उतरते आहेत. योगीराज संत चांगदेवांची समाधी याच्या मागील बाजूस आहे. समाधीजवळ चांगदेवांची संगमरवरी मूर्ती व पादुका आहेत. मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. या समाधीच्या पश्चिमेला गोदावरी नदीचे मोहक दृश्य वरून मोठे आकर्षक दिसते. दरवर्षी येथे आषाढ महिन्याच्या दुसऱ्या म्हणजे कामिका एकादशीला व कार्तिक मासात यात्रा भरते. सोमवारी 21 जुलाई 2025 रोजी ही यात्रा येथे भरत आहे. ज्या वारकरी भाविकांना पंढरपूरला आषाढी एकादशीला जाता आले नाही ते वारकरी भाविक श्री क्षेत्र पुणतांबा ला येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे व श्री योगीराज संत चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. इतर देवतांचे दर्शन घेतात . येथे या एकादशीला पांडुरंग पंढरपूर येथून येतात व भाविकांना दर्शन देतात. असेही बोलले जाते. येथे
पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे आणखी एक प्रसिद्ध व पुरातन असे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाच्या मुलाला जलोदर हा पोटाचा आजार झाला. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण आजार बरा होईना. त्यावर उपाय म्हणून गावाच्या कडेला यज्ञ करून त्यात एका बालकाचा बळी द्यावा, त्यामुळे आजार बरा होईल असे सांगण्यात आले. राजाने यज्ञाची तयारी केली पण बळी देण्यासाठी मुलगा मिळेना, म्हणून मग दवंडी देण्यात आली. तेव्हा शेजारी असलेल्या पुरणगावातील मुद्गल गोऱ्हे नामक मुलगा घरची हलाखीची परिस्थिती ध्यानी घेऊन बळी जाण्यास तयार झाला. धार्मिक विधीनंतर मुलास यज्ञात टाकले जात असताना यज्ञकुंडात देवी प्रकट झाली व देवीने त्या मुलास वरचेवर झेलून सोडून दिले, त्यामुळे त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुढे यज्ञातून जीवदान मिळालेल्या मुद्गलाने त्याच गावात आश्रय घेतला. त्याला एकशेचाळीस वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने देवी मंदिरापासून काही अंतरावर समाधी घेतली. देवी मंदिराशेजारी सुरेख असे मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर आहे. पुणतांबा हे गोदावरीच्या नदीकाठी वसलेल्या असून येथे १८ व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी नदीकाठी घाट बांधला आहे. पुणतांबा गावाभोवती जुनी काळातील दगडी संरक्षण भिंत असून तिची पडझड झालेली आहे. गावात अनेक जुने वाडे आहेत. येथे प्रसिद्ध व पुरातन श्री कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. श्रीक्षेत्र पुणतांबा हे मोठे गाव असून बाजारपेठेचे एक परिसरातील मोठे गाव समजले जाते. या गावातून मनमाड-दौंड लोहमार्ग तसेच शिर्डी लोहमार्ग गावातुन जातो. त्यामुळे पुणतांबा हे जंक्शन झाले आहे. त्यामुळे येथे बस व रेल्वेनेही येता येते. श्रीक्षेत्र पुणतांबा येथेच या आषाढ कामिका एकादशीला सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज भव्य अशा हरिनाम सप्ताहाचा नारळ दिला जातो. श्रीक्षेत्र सरला बेट चे मठाधिपती श्री रामगिरी महाराज यांच्या हस्ते हा नारळ जेथे हा भव्य हरिनाम सप्ताह होणार आहे त्या गावांच्या आयोजकांकडे सुपूर्द केला जातो. दिवसेंदिवस या गंगागिरी हरिनाम सप्ताह चे स्वरूप व्यापक प्रमाणात होत असल्यामुळे अगोदरच त्या गावांमधून तयारी सुरू होते .मात्र अधिकृतपणे नारळ याच एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे संबंधित गावच्या आयोजकांकडे, सप्ताह कमिटीकडे दिला जातो व ही पूर्वीपासून प्रथा रूढ आहे. यावर्षी शनिदेवगाव, भामाठाण, आदी सप्तकृषी भागांमध्ये हा सप्ताह होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र अधिकृतपणे हा नारळ सोमवारी एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथेच हरिनाम सप्ताह आयोजन करणाऱ्या सप्ताह कमिटी व त्या गावच्या आयोजकांकडे परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते दिला जाणार आहे. असे अनेक पुरातन रूढी परंपरा जपणारे व अनेक पुरातन ऐतिहासिक मंदिरे व इतिहास असणारे हे श्रीक्षेत्र पुणतांबा गाव असून या पुणतांबा तीर्थक्षेत्री सोमवार 21 जुलै 2025 रोजी मोठी यात्रा भरत आहे. यात्रेची जोरदार तयारी झाली असून रविवारपासूनच अनेक भाविक येथे दाखल होऊन हरिनामाचा जयघोष ऐकू येत आहे.
0 Comments