लोहगाव ( वार्ताहर)
भिल्ल समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करून त्या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भिल्ल समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करा-ज्ञानेश्वर अहिरे .
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हंटले आहे की, राज्यात आदिवासी भिल्ल समाजाची अतिशय दयनीय परिस्थिती आहे. अनेक कुटुंबांना अद्याप शासनाच्या घरकुलाचा लाभ मिळालेल्या नाहीत. तर काही भिल्ल कुटुंबाकडे तर राहायला जागाच नाही. आजही मोलमजुरी करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंतीची वेळ समाजावर आली आहे. त्यामुळे भिल्ल समाजाच्या मुलांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. राज्यात लाखोच्या संख्येने भिल्ल समाज आहे परंतु केवळ मतदाना पुरता वापर करून नंतर भिल्ल समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आज ही वेळ आदिवासींच्या वाट्याला आली आहे. या समाजाला जर प्रवाहात आणायचे असेल तर भिल्ल समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात यावा व त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला घर, रेशन कार्ड, जातीचे दाखले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच ज्या मुलांनी सध्या शिक्षण घेतले आहे त्यांना बेरोजगार न ठेवता शासनाने त्वरित शासकीय कोठ्यातील नोकरी द्यावी. तसेच शासकीय आदिवासी कोट्यातील निधी देऊन अनेक योजनांची अंमलबजावणी करावी त्यामुळे समाजाची आर्थिक स्थिती सुधारून प्रवाहात येण्यासाठी मदत होईल. प्रत्येक गावातील शाळेला सूचना देऊन भिल्ल समाजाचा कोणताही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा आदेश काढावा. गाव पातळीवर एक समिती नेमून योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही याची खतर जमा करावी व या समितीचा अध्यक्ष भिल्ल समाजाचाच असावा. अशा पद्धतीने काटेकोर अंमलबजावणी केली तरच भिल्ल समाज प्रगतीची वाट धरणार आहे अन्यथा मूळ मालक असलेला आदिवासी भिल्ल समाज असाच प्रगतीपासून दूर राहील यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी भिल्ल समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा व या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी ज्ञानेश्वर अहिरे यांनी केली आहे.
0 Comments