सोयगाव आगाराची बोगस आधारकार्ड शोध मोहीम, बोगस आधार कार्ड धारकांवर कारवाई करणार कोण?-



दिलीप शिंदे सोयगाव 
सोयगाव दि.16- राज्य सरकारने परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमध्ये वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक व महिलांना दिलेल्या प्रवासी भाड्यातील सवलती मुळे बोगस आधारकार्ड बनवून त्यावर वय वाढवून बस मध्ये प्रवास करणारांची संख्या वाढली असून बोगस आधारकार्डचा तालुक्यात सुळसुळाट वाढला आहे. 


यावर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.मात्र शहरातील बसस्थानक येथे सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून सवलतीत आधारकार्डाचा फायदा घेऊन बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आधारकार्ड चे फोटो सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून बसस्थानकावर काढले जात असून बोगस आधारकार्ड धारकांनी तूर्तास बस मध्ये प्रवास करणे टाळले असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. बोगस आधारकार्ड धारकांवर परिवहन विभाग कारवाई करण्यासाठी काय उपाययोजना करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी,राज्य सरकारने महिलांसाठी 50%, 65 वर्षावरील जेष्ठांना 50% व 75 वर्षावरील वयोवृद्धांना मोफत प्रवासाची सवलत दिल्याने राज्य परिवहन महामंडळाला सुगीचे दिवस आले आहे. कोणतेही नियोजन न करता केवळ राजकीय लाभासाठी हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 50% व वयोवृद्ध प्रवासी यांना मोफत अशी सवलत मिळाल्याने आधारकार्ड वर वय वाढवून भाड्यात सवलत मिळवून बस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डोक्याला ताप न करता वाहक आधारकार्डची पुष्टी न करताच तत्काळ तिकीट देऊन टाकतात. मात्र या सवलतींचा पैसा हा राज्य सरकारला परिवहन महामंडळाला द्यावा लागत असल्याने परिवहन महामंडळाकडून बोगस आधारकार्डची  शहानिशा केली जात नाही. दरम्यान सोयगाव बसस्थानक येथे आलेल्या बस गाड्यांमधून भाड्यामध्ये सवलतीत प्रवास करीत सोयगाव बसस्थानक येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे आधारकार्ड सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून जमा करून त्या आधारकार्ड चे फोटो काढून तत्काळ परत केले जात आहे.या मोहिमेमुळे बोगस आधारकार्ड धारकांनी बस ने प्रवास करण्याकडे पाठ फिरवली आहे. तपासणी मोहीम थांबल्यानंतर पुन्हा जैसे थे वैसे परिस्थीती राहणार आहे. बोगस आधारकार्ड चा वापर करून बस मध्ये प्रवास करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार हे मात्र निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments