शनि देवगाव(प्रतिनिधी)-गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटातील शनिदेवगाव सप्तक्रोशीत योगीराज सद्गुरू श्री.गंगागिरीजी महाराज यांचा १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दि. ३० जुलैपासून सुरू होत असून हा अखंड हरिनाम सप्ताह दि.०६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
हा सप्ताह सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू होत आहे. लाखो भाविक या सप्ताहाला उपस्थित राहत असतात. गिनीज बुक ऑफ इंडियामध्ये या सप्ताहाची नोंद झालेली आहे.
बुधवार हा सुरू होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह एकूण १८० एकरात भरणार आहे.शनिदेवगावसह पंचक्रोशीतील चेंडूफळ, बाजाठाण, अव्वलगाव, हमरापूर, कमलपूर आणि भामाठाण या ७ गावांनी मिळून हा सप्ताह यंदा घेतलेला आहे.या सप्ताहासाठी येणाऱ्या भक्तांना भजनाबरोबर गंगेच्याही स्नानाचा
लाभ व्हावा यासाठी हा सप्ताह यंदा गोदावरी नदीकाठी घेण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सप्ताहाला मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वा. निघणारी मिरवणूक दुपारी १२-१ पर्यंत चालणार असून ०१ वा. भजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भक्तांसाठी उद्या पहिल्या दिवशी पुरणपोळी आणि मांड्याचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर दररोज सप्ताहासाठी गावागावातून येणाऱ्या भाविकांना भाकरी आणि आमटीचा प्रसाद देण्यात येत असतो. त्यासाठी गावागावातून भाविक- भक्त भाकरी पाठवत असतात. पहिले पाच दिवस आमटी भाकरीचा प्रसाद असतो व सहाव्या दिवशी एकादशीला हभप.रामगिरी महाराज यांचे ४ ते ६ या वेळेत कीर्तन होणार आहे. त्यानंतर ०६ ऑगस्टला काल्याचे कीर्तन होणार आहे. यावर्षी या हरिनाम सप्ताहात लाखो भाविक येऊन एक रेकॉर्ड होणार असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments