दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.11- सोयगाव तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होता कामा नये. त्याचप्रमाणे, रासायनिक खतासोबत इतर उत्पादनांचे लिंकेजही कुठे होऊ नये, यासंदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बि-बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी सोयगाव येथील आढावा बैठकीत केल्या.
तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025 खरीप पूर्व तयारी आढावा बैठक सोयगाव शहरातील कोविड भवन येथे आमदार सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ लतीफ पठाण, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव,नायब तहसीलदार संभाजी देशमुख, काकासाहेब सावळे, तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडीले, शिवसेनेचे प्रभाकर काळे, अक्षय काळे, कुणाल राजपूत, शिवआप्पा चोपडे तसेच विविध संबंधित विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री, खतांचे लिंकेज, बियाणे, खते यांची साठेबाजी टाळावी बि-बियाणे पुरवठा व्यवस्था योग्यरीतीने करावा, त्यांना बियाणे व किटकनाशकांची उपलब्धता वेळेत होईल, याचे नियोजन तालुका कृषी विभागाने करावे.तालुक्यामध्ये खते, बियाणे, कमी पडणार नाही, याकरिता मागणी वाढवून घ्यावी, तसेच बोगस, बि-बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, असे निर्देश आमदार सत्तार यांनी दिले.तसेच पिक विमा योजना सन 2024-2025 मधील विमा रक्कम वाटप बाबत सद्यस्थिती तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना आढावा, खरीप हंगाम 2025 पिक कर्ज वाटप बाबत बँक अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.सूत्रसंचालन समाधान चौधरी यांनी केले.
0 Comments