निषिद्ध ठिकाणी नामस्मरण कसं करता येईल?

शिर्डी ( प्रतिनिधी)

नामस्मरण-एक अद्भुत साधन.
आपलं शरीर मल,मुत्र,घाम,आर्तव यांनी भरलेलं आहे. त्या शरीरात आपल्याला देवालाही बसवायचं आहे. आपल्या या अश्या घाण शरीरात देव कसा राहील? परमार्थही निभावयाचा आहे,त्यासाठीच नामाची योजना केलेली आहे. अखंड नाम हे श्वासात झिरपतं. शरीराच्या अणु-रेणुंतही शिरतं. तुमचं सबंध शरीरच दिव्य होवुन जातं. आपल्या श्वासातच नाम असल्यामुळे आपण कुठेही गेलो तरी आपल्याबरोबर नामही येतंच. ते आपली पाठ सोडत नाही. 

न्हाणीघरात,अगदी संडासातही नाम तुमच्याबरोबर आहेच. तोंडात नाम असेल तर ते इथे कसं म्हणायचं म्हणुन अव्हेरु नका. तुमचा श्वासच थांबवल्यासारखा होईल. म्हणुनच सुरुवातीला सांगितले होते की ॐ या अक्षराने सुरु होणारे नाम घेऊ नका. ते वैदिक मंत्र आहेत. त्यांना सोवळं-ओवळं लागतं. साधं देवाचं नाव घ्यायचं हो! किती विचार...! १९ दिवस झाले तरी अजुन तुमचं कोणतं नाम घेवु,हा घोळ चाललाय! देवाच्या नामाला स्थळकाळाचं बंधन नाही. सकाळी अगदी उठल्या-उठल्या देवाचं नाव तुमच्या तोंडात आलं पाहिजे. नाम हे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपेपर्यंत घ्यायचं असतं. काही जण तर रात्री झोपेतही नाम घेतात. सकाळी आंघोळ करुन मी नाम घेईन,असं ठरवलंत तर तुम्ही कालापव्यय करताहात! सकाळी आंघोळीला लवकर नंबर लागला नाही तर किती वेळ तुमचा नामाशिवाय फुकट जातो! न्हाणीघरात,संडासात मनोमन जप करायचा सराव ठेवा. नामाव्यतिरिक्त बाकी काहीही तुमच्या तोंडात नको. काही जण आंघोळ करताना अथर्वशीर्ष,गायत्री मंत्र म्हणतात. त्यांना मंत्रांची ताकदच कळलेली नसते. मंत्र म्हणजे केवळ शब्द नव्हेत! ते अयोग्य पद्धतीने म्हटलेत तर तुमच्यावरच उलटु शकतात. तेव्हा अर्धवट माहिती डोक्यात भरुन वाट्टेल ते प्रयोग करु नका. केवळ नामच असं साधन आहे की,जे तुम्ही २४ तास एखाद्या key chain सारखं बाळगु शकता. अगदी कुणाच्या मयताला गेलात तरी तुम्ही नाम घेवु शकता. मनोमन जप करा. तुमच्या घरी मयत झाले असेल तरी तुम्ही नाम मनातल्या मनात घेवु शकता. आपल्याला माळ घेवुन जप करता येणारच नाही,अश्या वेळी तुम्ही मनातल्या मनात जप करायचा सराव करा.सुरुवातीला खुप कठीण असतं ते! पण practice makes man perfect! ही म्हण इथे लक्षात ठेवुन मेहनत घ्या. हरी तुम्हाला खाटल्यावर आणून देणारा नाही.त्यासाठी मेहनत तुमची तुम्हालाच करावी लागेल.स्रिया पाळीच्या दिवसांतही नामस्मरण करू शकतात. फार तर माळ हातात घेता येणार नाही. दुसरी साधने वापरता येईल. याबाबतची चर्चा पुढील लेखात आहेच.

क्रमश:

— वैद्य.वर्षा लाड.

Post a Comment

0 Comments