नामस्मरणानेच सगळं होत असेल,तर रोजची देवपुजा,कर्मकांडे कशाला करायला हवीत






(शब्दांकन कोडीराम नेहे)

.प्रश्न खोचक आहे की नाही,माहीत नाही,पण बरोबर आहे. रोजची देवपुजा करतो,म्हणजे आपण नक्की काय करतो?  आपण जसं सकाळी आंघोळ करुन सजुन बसतो,तसंच देवांनाही सजवतो. त्यांना दुधाने आंघोळ घालुन,चंदन,गंध,हळद-कुंकू,अक्षता,फुले वाहातो. थोडक्यात आपल्या मते देवही पारोसे असतात. त्यांना आजच्या दिवसासाठी तयार करतो. ईश्वर हा निराकार,निर्गुण आहे,पण मग त्यांचं अस्तित्व कसं ठरवायचं,त्याला कसं ओळखायचं? यासाठी आपण त्यांना मुर्तीरुपात,फोटोत बद्ध केलं. ह्या मुर्तींना,फोटोंना अक्षता,फुले वाहिली की मन प्रसन्न होते. त्यानंतर आपला संबंध येतो तो direct संध्याकाळी,सांजवात करताना! काही घरांत माणसे रात्री कामावरुन येणारी असतील तर ही सांजवात सुद्धा होत नाही. एकदम सकाळीच देवपुजा होते. रोजचंच हे कर्तव्य असल्यामुळे ही पुजाही ब-याच ठिकाणी कोरडेपणाने पार पाडली जाते. 
बहुतेक वेळा घरातल्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यात हे काम पडतं. घरातुन बाहेर पडताना एक नमस्कार ठोकला की बस्स झालं! अशा रितीने केलेली पुजा तुम्हाला कितीसं फळ देणार आहे? 
आपण सगळेच रजो,तमोगुणी आहोत. स्तोत्र,मंत्रपठण करताना जितका सत्वगुण अधिक असेल तितकं चांगलं असतं,पण असं व्यवहारात फारसं काही आढळत नाही. फललाभ झाले नाहीत तर मग लोक मंत्रशास्राला,स्तोत्रांना नावे ठेवतात. मी अमुक-अमुक देवाचं तमुक-तमुक केलं,पण मला काही फायदा झालाच नाही,असे बरेच जण ब-याच वेळा म्हणतात,ते याच मुळे!
साधं सत्यनारायणाच्या पुजेचं उदाहरण घेवुया. ह्या पुजेची कथा ऐकल्याने सौख्य,समाधान, संपत्ती सर्व काही मिळतं,असं फलनिष्पत्तीत म्हटलं आहे. व्यवहारात काय दिसतं? पुजेपेक्षा जेवणाची जास्त गडबड असते. घरातली गृहिणी पुरणपोळीला तुप तव्यावर लावु की,ताटात लावु,या फिकीरीत असते. परातीतल्या अळुवड्या आणि हाॅलमधली एकुण डोकी यांचं व्यस्त प्रमाण तिच्या डोक्यात कलकल करत असतं. पुजेला घरातलंच जोडपं असतं किंवा कुमार मुलगा सोवळ्यात बसवलेला असतो. तो कुमार आणि भटजी पुजा यथासांग पार पाडतात. ती कथा ऐकायला एखाद-दुसरी व्यक्ती असते. बहुतेक करुन घरातली ज्येष्ठ मंडळीच चटईवर बसलेली असतात. एखादी बाई कथा ऐकायला बसलेली असेल,तर अहो ताई,तुम्ही रिकाम्याच आहात ना,जरा ही वेलची कुटून ठेवा ना..असं म्हणुन तिच्याही गळ्यात काम अडकवलं जातं! आरतीला मात्र झाडुन सगळेजण हजर रहातात. आरतीबद्दल तर वेगळाच लेख लिहावा लागेल. अशा नैमित्तिक पुजेच्या फलनिष्पत्तीबाबत फारश्या अपेक्षा धरु नयेत. कोणतीही पुजा,मंत्र,स्तोत्र पठण करताना त्यांचे उच्चार जसे शुद्ध असावे लागतात,तसे मनीचा भावही शुद्ध असावा लागतो. 
नामस्मरण केलेला साधक ही सगळी कर्मकांडे आनंदाने करतो,जास्तच करतो,कारण त्याला ईश्वराची ओळख पटलेली असते. नामस्मरण करत असाल तर देवपुजा,कर्मकांडे सोडायची नसतात. आपले सण,परंपराही तसेच आहेत. प्रत्येक देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता,संस्कृती टिकवण्याकरता हे सण साजरे करायला हवेत. नामी साधकाला हे काही सांगावे लागत नाही. उलट या परंपरा साजरी करण्यात तो उत्साहाने पुढाकार घेतो. गोंदवलेला श्रीराम नवमीचा असाच थाट आहे. तिथे हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगतींच्या पंगती उठतात. त्र्यंबकेश्वरला देवळातल्या महादेवाची पालखी अख्ख्या गावातुन निघते,तो सोहळा तर अनुपमेय आहे. रस्त्यारस्त्यांवर रांगोळ्यांचे सडे घातलेले असतात. गृहिणी पैठण्या नेसुन, सालंकृत औक्षंण करायला तयार असतात.ढोल,ताशे,नगारे वाजत असतात.हवेत गुलाल उधळला जातो. हे खरे सोहळे!! मी होते एकदा तिथे...मला तर तिथुन हलावसंच वाटत नव्हतं! 
तुम्ही नामस्मरणाच्या या होमकुंडात उडी मारा,स्वाहा व्हा. त्यातुन एक दैदिप्यमान,सत्वगुणी व्यक्तिमत्व,जे ईश्वरालाही बांधुन ठेवणारे असेल. कर्मकांडे सोडु नका. तुम्ही एकदा नामस्मरणाला सुरुवात केली की ह्या कामांसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही,तो आपोआप मिळतो!
वैद्य वर्षा लाड.

Post a Comment

0 Comments