संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात जागतिक जल व वन दिनानिमित्त व्याख्यान--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.05-  येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे जागतिक जल व वन दिनानिमित्त दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी मराठवाड्यातील भूजल व वनसंपदा यावर काम करणारे नामवंत व्याख्याते बोलावण्यात आले होते. 
या व्याख्यानमालेतील पहिले व्याख्यान दि.03 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाले. प्रा डॉ प्रमोद पाथ्रीकर भूगर्भशास्त्र विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथ्री यांच्या  "जलस्त्रोतांचे संरक्षण आणि नागरिकांची भूमिका" या विषयाने झाली.  प्रत्येक विद्यार्थ्यांने जल संवर्धन व त्याचे संरक्षण करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पृथ्वीतलावरील पाणी वाचले तर जीवसृष्टी वाचेल आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करून पाण्याची शुद्धता व त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ भोरे शत्रुघ्न उद्धव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश गायकवाड यांनी केले. शेवटी प्रा. श्रीकृष्ण परिहार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
     दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी दुसरे व्याख्यान डॉ सचिन मोरे, भूगोल विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथ्री यांचे होते. त्यांनी वन दिनाच्या निमित्ताने "वन संवर्धन आणि नागरिकांची भूमिका" याविषयी आपले मत मांडले. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपण वने जोपासली पाहिजेत. दरवर्षी केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही तर लावलेली वृक्ष जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.
     व्याख्यानमालेच्या समारोप प्रा. डॉ. मदनलाल सूर्यवंशी भूगोल विभाग प्रमुख बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी "वन आणि हवामान बदल" याविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या विषयाची मांडणी केली. पृथ्वीवरील वनांचे अस्तित्व कमी कमी होत गेल्या मुळे आज हवामानामध्ये मोठे बदल होत असल्याचे आढळून येत आहे भारतातील अस्तित्वात असलेले तीन ऋतू उन्हाळा -पावसाळा- हिवाळा हे हवामान बदलामुळे आज  विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. वृक्ष हे सावली, फळे, ऑक्सिजन व पशुपक्षांना निवारा इत्यादी देत असतात त्याचबरोबर वृक्षामुळे मृदेची धूप होते नाही एवढेच नाही तर जागतिक तापमान वृद्धीला रोखण्याचे काम हे वनेच करत असतात. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड वायूचे शोषण करून त्याद्वारे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून वनस्पती आपले अन्न निर्माण करत असतात तर त्यातून ऑक्सिजन हा वातावरणामध्ये सोडत असतात त्यातून वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे वनस्पती करत असतात परंतु आज मानवाने आपल्या शेतीसाठी, विकास कार्यासाठी वने मोठ्या प्रमाणात तोडण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे मोठा भूभाग ओसाड व वाळवंटे बनण्याकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे तेव्हा या तरुण पिढीने विद्यार्थ्यांनी याकडे गांभीर्याने पाहून वनसंवर्धन व त्याचे संरक्षण करण्याची इच्छा व्यक्त केली. व्याख्यानमालेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा भोरे शत्रुघ्न यांनी केले तर आभार प्रा पंडित नलावडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंकज शिंदे यांनी केले.
     या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, डॉ प्रमोद पवार, डॉ. भास्कर टेकाळे व इतर प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान मालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज शिंदे यांनी परिश्रम घेतले.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments