दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.13- शहरासह तालुक्यात सर्रास गौनखनिज चोरटी वाहतूक जोमात सुरू असून तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड व गौनखनिज प्रतिबंधात्मक पथक कोमात असे चित्र सोयगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. हायवा व ट्रॅक्टर द्वारे गौण खनिज चोरटी वाहतूक सुरू असून शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वाळू चे साठे आहेत परंतु तलाठी,मंडळ अधिकारी हे कारवाई करण्यास धजावत नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, महसूल चे गौण खनिज प्रतिबंधात्मक पथक कारवाई करीत नसल्याने सोयगाव सह तालुक्यात गौण खनिज चोरटी वाहतूक फोफावल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने महसुलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मार्च अखेर का होईना गौण खनिज प्रतिबंधित पथकास सूर गवसला व दि.25 मार्च मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचून चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून महसूल ने कारवाई केली. मात्र चोरट्या गौण खनिज वाहतुकीला आळा तर बसला नाही उलट गौण खनिज चोरटी वाहतूकी मध्ये वाढ झाली असून दिवस रात्र वाहतूक सुरू आहे.तहसिल कार्यालयासमोरुन गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात आहे. सोयगाव पोलीसानी वडगाव तिगजी येथे दि.22 जानेवारी रोजी चोरटी वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक एम.एच.-18 बीजी-5277 यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महसूल विभागाने दि.25 मार्च रोजी चोरटी वाहतूक करणाऱ्या टाटा हायवा ट्रक (क्रमांक एम एच 20 ई सी 1773) वर दंडात्मक कारवाई केली होती. या कारवाई नंतर महसूल व सोयगाव पोलिसांनी चोरटी गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यास फुल स्टॉप दिल्याने चोरटी गौण खनिज वाहतूक करणारे जोमात तर हात ओले असल्याने महसूल विभाग कोमात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेला महसूल सहाय्यक वर्ग-3 (अनधिकृत गौण खनिज उत्खनन/वाहतूक कार्यवाही पथक) शरद पाटील यास दि. 25 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने चोरटी वाळू वाहतूक करणारा कडून 20,000 रु हप्ता घेत असतांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर शरद पाटील यांची सोयगाव तहसिल कार्यालयात बदली करण्यात आली. गौण खनिजात तरबेज असलेला शरद पाटील बनोटी सर्कल कडील तर काही माफियांचे शिपाई,कोतवाल व झिरो कडून चोरटी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांकडून महसूलचे हप्ते वसूल करीत असल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकात मंडळ अधिकारी, तलाठी,कोतवाल यांची सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत चोरटी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यासाठी नेमणूक केली आहे. मात्र गौण खनिज प्रतिबंधात्मक पथकात नेमणूक असलेले मंडळ अधिकारी, तलाठी,कोतवाल हे चोरटी गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी मुख्यालयी राहत नसल्याने तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याने तहसिल कार्यालयात सर्व काही अलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments