सामान्य माणूस जो पर्यन्त मराठीतून बोलत राहील, तो पर्यन्त मराठी भाषेला धोका नाही- डॉ.संतोष तांदळे



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27 - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन ' संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात  मराठी विभागाद्वारे  साजरा करण्यात आला.

डॉ. तांदळे पुढे बोलताना म्हणाले की महाराष्ट्रातला ग्रामीण सर्वसामान्य माणूस जोपर्यंत मराठी बोलतो तोपर्यंत मराठी भाषेला धोका नाही. सर्वसामान्य माणूस हा समृद्ध मराठी बोलतो. त्याच्याकडे मराठीतील शब्दांचे भंडार आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात तो प्रमाणभाषे पेक्षा बोली भाषेत अधिक बोलत असतो हे एका अर्थाने मराठी भाषा संवर्धनाचे काम करत असतो.  नुकताच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. यामुळे  देशभरातल्या 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. राज्यातील 12000 ग्रंथालयासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे या निर्णयामुळे सर्व  ग्रंथालयाचे सशक्तीकरण होणार आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी भाषा जपण्यासाठी तिच्या संवर्धनासाठी काम करणारे संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत मिळू शकते असे सांगितले. 


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.भास्कर साठे, (डॉ.बा.आ.म.विद्यापीठातील )हे उपस्थित होते. डॉ. भास्कर साठे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इंग्रजी अभ्यासक्रमातील पुस्तके मराठी भाषेतून येत गेल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख,  डॉ.दिलीप बिरुटे यांनी केले. त्यांनी मराठी भाषेचं संवर्धन आणि गौरव करणं हे या दिवसाचं मुख्य औचित्य होतं हे सांगून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी अध्यक्षीय समारोपात मराठी भाषेची महती तसेच तिचे स्वयंभूपण, प्राचीन वारसा याबाबत आपले विवेचन केले. व्यासपीठावर विचारपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य रावसाहेब बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती स्वामी यांनी केले तर आभार डॉ. रमेश औताडे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव)

Post a Comment

0 Comments