टाकळी भान (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान साकार झाले आहे. त्या आधारे तयार झालेले विविध कायदे महिलांनी समजून घेतले पाहिजेत. तसेच दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी या कायद्यांचा वापर करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा बालकल्याण समितीच्या माजी सदस्य ऍडव्होकेट ज्योत्स्ना कदम यांनी केले.
महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित महिला मेळाव्यात त्यांनी महिलांचे हक्क व कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी बचत गट चळवळीतील कार्यकर्त्या शालिनी ससाणे अध्यक्षस्थानी होत्या. महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे व मुकुंद टंकसाळे यांनी एकल महिलांसाठी सुरू केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या सारखे एकल महिलांच्या प्रश्नांसाठी लढणारे भक्कम भाऊ एकल महिलांसोबत आहेत. त्यामुळे या एकल महिलांनी देखील अशा भक्कम भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. त्यासाठी महात्मा फुले यांनी त्यांना भक्कम साथ दिली. त्यासोबतच मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका फातिमा शेख यांनी देखील सावित्रीबाईंना मोलाची साथ दिली. त्याप्रमाणे उपस्थित महिलांनी समितीला साथ द्यावी, असेही त्या म्हणाल्या.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच आजची महिला समाजाच्या विविध क्षेत्रात ताठ मानेने व तडफेने काम करताना दिसत आहे. कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर अनेक महिला एकट्या पडल्या. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व इतर महिलांसाठी विविध कायदे अस्तित्वात आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ च्या कलम १२ नुसार महिला आपल्या पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या वारस होऊ शकतात. तालुकास्तरावर महिलांना मोफत कायदेविषयक सल्ला देणारी तालुका विधी सेवा प्राधिकरण यासारखी यंत्रणा अस्तित्वात आहे. या माध्यमातून महिलांना विविध कायदेविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोफत मदत मिळू शकते. कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे व शाळेतून मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे बालकल्याण समितीत काम करताना दिसून आले. त्यामुळे महिलांनी आपल्या मुलींचे बालविवाह होणार नाहीत, याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. बालके व महिलांसाठी निवारागृह, बालगृह, बाल संगोपन योजना प्रतिपालकत्व, मनोधैर्य योजना अशा विविध कल्याण योजना कार्यान्वित असल्याचे अँड. कदम यांनी विस्ताराने सांगितले.
मिलिंदकुमार साळवे म्हणाले की, कोरोनाच्या महासंकटात घरातील कर्ता पुरुष असलेला आधार गमावल्यानंतर एकाकी पडलेल्या महिलांसाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात एक संघटन उभे राहिले. त्यातून महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समिती गठित झाली. या समितीने राज्यभरातील कोरोना एकल महिलांच्या व बालकांच्या प्रश्नावर काम सुरू केल्यानंतर त्यांचे विविध प्रश्न व त्यांची व्याप्ती लक्षात आली. या महिलांप्रमाणेच इतरही एकल महिलांचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून फक्त कोरोना एकल महिलांसाठी काम न करता सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी काम करण्यासाठी महाराष्ट्र साऊ एकल महिला समिती निर्माण केली आहे. महिलांनी खचून न जाता विविध शासकीय योजनांचा आधार घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे, असे आवाहन साळवे यांनी यावेळी केले.
समितीचे तालुका समन्वयक बाळासाहेब जपे यांनी समितीच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. सामाजिक कार्यकर्ते व भाजप महिला मोर्चा मोर्चाच्या अनिता शर्मा, सायली दुबे, संगीता कुरुंद, यांनीही मनोगत व्यक्त केले. मुकुंद टंकसाळे यांनी बालसंगोपन योजनेबाबत मार्गदर्शन केले.
उपस्थित महिलांनी त्यांना व त्यांच्या बालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल साळवे, जपे, टंकसाळे यांचा सत्कार करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मंजुषा गायकवाड, कविता दिवे, दुर्गा नाटकर, वर्षा मटाले, अरूणा शेळके, भूमिका बागुल, बुशरा शेख, हिना आतार,वंदना काळे, कुसूम त्रिभुवन, प्रमिला त्रिभुवन, समीना जमादार, तरन्नुम शेख, ज्योती कुऱ्हे, अमृता सोनवणे, रूबिना सय्यद, जयश्री कुसळकर, अनिता वायदंडे, सुनीता भवार,ज्योती मोरगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments