मांजा विक्री, वापर न करण्यासाठी जनजागृती; ४ पथके तैनात, राहुरी पोलिसांचा आगळा-वेगळा उपक्रम नायलॉन




राहुरी / प्रतिनिधी : राहुरी पोलिस नायलॉन मांजा विक्री व वापर न करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात समक्ष भेट देत जनजागृती करत प्रबोधन केले. पतंग उडविताना घ्यावयाच्या खबरदारी विषयी मार्गदर्शन केले. सोबतच नायलॉन मांजा विक्री करत आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला असून यासाठी पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे. 

   राहुरी पोलीसांनी संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना समक्ष भेटून प्रबोधन केले. तसेच तालुक्यातील शाळा प्रशासनाला गटविकास अधिकारी श्री मुंडे व गटशिक्षणाधिकारी श्री तुंबारे यांच्यामार्फत आवाहन करून विद्यार्थ्यांना पतंग उडवताना घ्यावयाची खबरदारी व नायलॉन मांजा न वापरण्याबाबत शपथ घेण्याबाबत आवाहन केले असता. तालुक्यातील सुमारे ३५० शाळांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत साधारण  १० हजार विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची व सुरक्षित पतंग उडवण्याची शपथ घेतली आहे. 
  शपथेत 'आम्ही पतंग उडवताना आमच्या व इतर नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेवु. आम्ही पतंग उडवल्यास आमचा तसेच इतर कुणाचा ही  अपघात होणार नाही याची खबरदारी घेवू. तसेच पतंग उडवताना  आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही, इतरानाही वापरू देणार नाही. तसेच कुणी नायलॉन मांजा वापरत असल्यास / विक्री करत असल्यास त्याची माहिती वडीलधाऱ्या मंडळींना, गावातील पोलीस पाटील यांना, पोलिसांना तसेच वर्ग शिक्षक यांना माहिती देवू.' याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राहुरी पोलिस व शिक्षण विभाग यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सध्या तालुक्यातून कौतुक होत आहे. 
   गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना दवंडी देऊन मांजाचा वापर न करता सुरक्षितपणे पतंग उडवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 
  सदरचा उपक्रम राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहायक फौजदार अंबादास गीते, पोलिस हवालदार अशोक शिंदे, संदीप ठाणगे, शकूर सय्यद, आजिनाथ पाखरे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे यांच्या पथकाने तसेच गटविकास अधिकारी श्री मुंडे व गटशिक्षणाधिकारी श्री तुंबारे  व सर्व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments