लोहगाव (वार्ताहर)
(महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाची शासनाकडे मागणी)
श्रीरामपूर : कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर दि. १३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठी विषय इयत्ता बारावीपर्यंत अनिवार्य करावा, अशा आशयाचे परिपत्रक यापूर्वीच शासनाने जारी केले आहे;
परंतु या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच वर्धा येथील विश्रामगृहावर मराठी विषय शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी यांच्याकडून शालेय शिक्षण, गृहनिर्माण, सहकार आणि खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री नामदार डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, जिल्हाध्यक्ष प्रा. गिरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद राठोड, प्रा. मृणाल काटोलकर, प्रसिद्धीप्रमुख अमित जिनेवार, विशेष निमंत्रित अनिस बेग यांच्यासह कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यमंत्री नामदार डॉ. पंकज भोयर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. मनीषा रिठे आणि प्रा. गिरीश काळे यांनी महासंघाच्या या मागणीचे सविस्तर विश्लेषण करून येत्या जून २०२५-२६ पासून मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी अपेक्षा मंत्री महोदयांकडे व्यक्त केली. यावेळी नामदार डॉ. पंकज भोयर यांनी ही मागणी शासन स्तरावर मांडून लवकरच ती मान्य करून मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत आश्वासित केले.
मराठी विषय शिक्षक महासंघाच्या या मागणीची दखल घेतल्याबद्दल महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले (बारामती), कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे (वर्धा), कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे (पुणे) आणि सचिव प्रा. बाळासाहेब माने (मुंबई) यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि मराठी विषय शिक्षकांनी आभार व्यक्त केले आहे. अशाच आशयाचे निवेदन मराठी महासंघाच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनाही देण्यात आले आहे.
0 Comments