शांततेत आणि मुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस दलाने आपले कर्तव्य चोखपणे बजवावे--विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा,

शिर्डी (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलाने देशाच्याप्रती आपले  कर्तव्य पार पाडण्याची  जबाबदारी चोखपणे संभाळावी,अशी सूचना विशेष पोलीस निवडणूक निरीक्षक दीपक मिश्रा यांनी केली. 

अ,नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते. श्री.मिश्रा म्हणाले, आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सिव्हिजील ॲपचे महत्व लक्षात घेता ॲपबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी. निवडणुकीत कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने नियोजन करावे. त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे स्तर निश्चित करून प्रत्येक स्तरासाठी प्रतिसाद देण्यासाठी कालावधी निश्चित करावा. मतदानापूर्वी एक दिवस सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घ्यावा. वृद्ध मतदारांना सुलभ मतदान करता यावे, यासाठी व्हीलचेअरसारख्या आवश्यक सुविधा द्याव्या. मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी नेण्यास प्रतिबंध करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यांनी निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती दिली. आतापर्यंत विविध प्रकरणात १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध मद्य, पैसे, सोने आदी २९ कोटी ७३ लाखाचा मुद्देमाल पकडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments