विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून गरजू कुटुंबांना दीपावलीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भिंगार : रयत शिक्षण संस्थेचे विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दीपावलीनिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबविला. दीपावलीचा सण सर्वांच्याच जीवनात आनंद, उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो. मात्र समाजातील काही गरजू व गरीब कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे हा सण आनंदाने साजरा करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने व स्वतःच्या पुढाकारातून गरजूंसाठी दीपावलीला आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू जमा केल्या.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौक, स्टेट बँक चौक तसेच रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन गरजू व वंचित नागरिकांना दीपावलीनिमित्त जमा केलेल्या साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या मदतीमुळे गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
हा सामाजिक उपक्रम माननीय संकुलाच्या सर्वेसर्वा रितू दीदी ॲबट यांच्या प्रेरणेने तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य इंजि.विजय बेरड यांच्या उपस्थितीत सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. प्रमोदजी तोरणे यांच्या मार्गदर्शनाने श्री नारायण अनभुले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमासाठी प्राथमिक विभागातील सौ. पाठक , सौ. गवळी , श्रीमती धोंडे , सौ. शेळके , श्रीमती गलांडे व श्री. कासार यांनी विशेष सहकार्य केले. तसेच माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती कविता शिंदे, श्री. पाडळे , श्रीमती घायतडक व श्रीमती मोरे यांनीही विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून साहित्य वाटपाच्या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ वस्तूंचे वाटप करण्याचा अनुभव मिळाला नाही, तर समाजातील गरजू व्यक्तींबद्दल सहानुभूती, दया, माणुसकी, सहकार्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही निर्माण झाली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हेच या उपक्रमाचे खरे उद्दिष्ट ठरले.
'दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खऱ्या अर्थाने दीपावली!' हा सुंदर संदेश देणारा विश्वशंकर प्राथमिक विद्यालयाचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
0 Comments