शिर्डी (प्रतिनिधी)
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत, आखाडे, संन्यासी आणि भाविकांच्या निवास व सुविधांसाठी साधुग्रामची जागा तातडीने निश्चित करून उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी महंत श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी महाराज,( श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी ट्रस्ट, पिंपरी निर्मळ) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संतपरंपरा, सनातन संस्कृती, अध्यात्म आणि धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा भव्य उत्सव आहे. या कुंभमेळ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, साधू-संत, संन्यासी तसेच लाखो भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये साधू-महंतांसाठी स्वतंत्र, प्रशस्त आणि मूलभूत सुविधांनी युक्त साधुग्राम उभारणे अत्यंत आवश्यक आहे.
साधुग्रामच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने साधुग्रामसाठी आवश्यक असलेली जागा लवकरात लवकर निश्चित करावी. साधू-संतांच्या निवासाची व्यवस्था, आखाड्यांसाठी स्वतंत्र जागा, धार्मिक अनुष्ठाने, पूजा-अर्चा, प्रवचन, भजन-कीर्तन आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
साधू-महंतांना कुंभमेळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी, वीज, स्वच्छतागृहे, स्वच्छता, आरोग्यसेवा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन वेळेत करण्यात यावे. साधुग्रामची जागा निश्चित करण्यास विलंब झाल्यास पुढील नियोजन आणि आखाड्यांच्या व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाला प्राधान्य देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांनी केली आहे.तसेच
या सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांनी विशेष स्वागत व कौतुक करत हा ध्वजारोहण समारंभ धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जेचा प्रतीकात्मक सोहळा ठरला असून, या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सकारात्मक दिशा मिळाली आहे.
या ध्वजारोहण सोहळ्यामुळे साधू-संत, आखाडे आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंभमेळ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे व्हावे आणि सर्व धार्मिक परंपरांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करत
साधू-संतांच्या सन्मानाला प्राधान्य द्यावे. असे म्हटले आहे.
कुंभमेळ्याचे खरे वैभव म्हणजे देशभरातून येणारे साधू-संत, महंत, आखाडे आणि त्यांची समृद्ध धार्मिक परंपरा होय. त्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनात साधू-महंतांच्या गरजा आणि धार्मिक परंपरांचा आदर राखणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. साधुग्राममध्ये सर्व आखाड्यांना योग्य जागा, धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे.
सिंहस्थ कुंभमेळा जागतिक स्तरावर नाशिक-त्र्यंबकेश्वरची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक करणारा असा ठरणार आहे. त्यामुळे हा कुंभमेळा भव्य, दिव्य, शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडण्यासाठी शासन, प्रशासन, धार्मिक संस्था, आखाडे आणि स्थानिक नागरिक यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून
शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पुढील नियोजनात साधू-संतांच्या निवासासाठी साधुग्रामची जागा तातडीने निश्चित करून ती उपलब्ध करून द्यावी. कुंभमेळ्याच्या तयारीला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, अशी अपेक्षा श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरी ट्रस्टचे महंत श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांनी व्यक्त केली आहे.
0 Comments