राष्ट्रवादीचे २०२६ मधील विलिनीकरण; रोहित पवारांना राज्यात तर सुप्रिया सुळेंना केंद्रात 'सेट' करण्याचा शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक?


अहिल्यानगर( जिल्हा प्रतिनिधी)

राजकारणाच्या सारीपाटावर शरद पवार हे नाव नुसतेच घेतले जात नाही, तर त्यामागे अनेक दशकांची अभेद्य राजकीय खेळी असते. २०२६ च्या उंबरठ्यावर उभे असताना, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आहे. वरवर पाहता हा केवळ दोन गटांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा वाटत असला, तरी या पडद्यामागे शरद पवारांचा एक अतिशय अचूक आणि दूरगामी 'मास्टरस्ट्रोक' शिजत आहे. तो म्हणजे—सुप्रिया सुळे यांना केंद्रात (दिल्लीत) निर्विवाद वारसदार म्हणून प्रस्थापित करणे आणि पार्थ पवारांचा काटा अलगद बाजूला काढून रोहित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात 'सेट' करणे!
दादांच्या पश्चात पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवारांच्या हाती येतील, हा अंदाज सिंडिकेट राष्ट्रवादीने हाणून पाडत सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवले होते. 


दादा जाऊन जवळपास नऊ-दहा महिने उलटले आहेत. पण या काळात अजित पवार गटातील अंतर्गत बजबजपुरी चव्हाट्यावर आली. पार्थ पवारांच्या मनमानी कारभाराला पक्षातील ज्येष्ठ नेते वैतागले. या राजकीय गोंधळात अजित पवार गटाला ना अर्थमंत्रीपद खेचून आणता आले, ना विधान परिषदेत तिकीट मिळवून हक्काची जागा राखता आली. पदाधिकाऱ्यांच्या परस्पर निवडी होऊ लागल्याने आपले राजकीय भविष्य अंधारात असल्याची जाणीव सिंडिकेट नेत्यांना झाली. याच असंतोषातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या सिंडिकेट नेत्यांनी पुन्हा एकदा 'विलिनीकरणाचे' हत्यार उपसले. सुरुवातीला सुनेत्रा पवारांना केवळ नामधारी प्रमुख ठेवून पडद्यामागून सूत्रे हलवण्याचा सिंडिकेटचा डाव होता. पण सुनेत्रा पवारांनी राजकीय अनुभव नसतानाही पक्षात लक्ष घालायला सुरुवात केली, आणि तिथेच ठिणगी पडली. गटातटाचे राजकारण, पक्षाच्या घटनेत परस्पर केलेले बदल आणि कथित ऑडिओ क्लिपने सिंडिकेट आणि सुनेत्रा पवार यांच्यातील दरी रुंदावली. धनंजय मुंडे यांच्यासारखे सुरुवातीला सुनेत्रा पवारांसोबत असलेले नेते मंत्रिमंडळात पुनरागमन होत नाही हे पाहून दुरावले, तर वळसे पाटलांसारखे नेतेही आता सिंडिकेटच्या कंपूत सामील झालेत. गोकुळच्या पराभवानंतर तरुण नेत्यांनी ज्येष्ठांना जाब विचारल्याने पार्थ पवार या सर्व असंतोषाचा केंद्रबिंदू ठरले.
हीच ती अचूक वेळ होती, ज्याची शरद पवार शांतपणे वाट पाहत होते. सुरुवातीला पवारांना कडाडून विरोध करणाऱ्या पटेल-तटकरेंनी आपला हस्तक्षेप कमी होत असल्याचे पाहून पुन्हा पवारांशी संधान बांधायला सुरुवात केली. सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी हा विलिनीकरणाचा प्रस्ताव धुडकावून लावला असला, तरी त्यांचे यापुढचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. कारण, जर हे विलिनीकरण झाले, तर दोन्ही पक्ष एक होतील आणि पक्षाची संपूर्ण सूत्रे एकट्या शरद पवारांच्या हातात जातील. इथेच पवारांची ती ऐतिहासिक खेळी पूर्णत्वास जाईल. विलिनीकरणानंतर शरद पवार गटाकडे साहजिकच अर्थमंत्रीपद जाईल आणि सुनेत्रा पवार केवळ पुढची तीन वर्षे नामधारी राहतील. या सर्व प्रक्रियेत सिंडिकेट आपले स्वार्थ साधेल, पण खरा राजकीय फायदा शरद पवारच उचलतील. काँग्रेस सोडून समाजवादीची स्थापना असो, किंवा सोनिया गांधींना कडाडून विरोध करून सहा महिन्यांत त्यांचे नेतृत्व स्वीकारणे असो, पवार भूतकाळ विसरून राजकीय सोय पाहण्यात पटाईत आहेत. पक्षफुटीनंतर कोणालाही न सोडणारे पवार, आता सिंडिकेटला पुन्हा जवळ करून आपला सर्वात मोठा डाव साधणार आहेत.
आणि हा डाव म्हणजेच सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करणे! विलिनीकरणानंतर पक्षाचे निर्विवाद वारसदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव अधिकृतपणे समोर येईल आणि दिल्लीच्या (केंद्राच्या) राजकारणात त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. दुसरीकडे, या विलिनीकरणामुळे सुनेत्रा पवार आणि विशेषतः पार्थ पवार यांचे पक्षावरील वर्चस्व कायमचे संपुष्टात येईल. पार्थ पवार बाजूला फेकले गेल्यामुळे, राज्यातील तरुण नेतृत्वाची जी पोकळी निर्माण होईल, ती भरून काढण्यासाठी रोहित पवारांसाठी एक मोकळे मैदान तयार होईल. रोहित पवार आपल्या आजोबांप्रमाणे (अजितदादांप्रमाणे) बंडखोरीचा किंवा सोयीच्या राजकारणाचा मार्ग निवडणार की पक्षात राहून स्वतःला रिलेव्हंट ठेवणार, हा जो प्रश्न विचारला जात होता, त्याचे उत्तर शरद पवारांनी या विलिनीकरणातून दिले आहे. राज्यातील सर्व सूत्रे आणि युवा नेतृत्वाची धुरा रोहित पवारांच्या खांद्यावर देऊन त्यांना महाराष्ट्रात खंबीरपणे 'सेट' करण्याचा हा मेगाप्लॅन आहे. काल रात्री पवारांकडून यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. थोडक्यात सांगायचे तर, या विलिनीकरणात सिंडिकेट बाजी मारेल, सुनेत्रा आणि पार्थ पवार यांचा दारुण पराभव होईल, पण खऱ्या अर्थाने दिल्लीत सुप्रिया सुळे आणि राज्यात रोहित पवार असे दुहेरी नेतृत्व उभे करून शरद पवारच या महाभारताचे अंतिम विजेते ठरतील!
 महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पडद्यामागची इनसाईड स्टोरी , शरद पवारांचा हा सुप्रिया-रोहित यांना सेट करण्याचा डाव यशस्वी होईल का......
आयडिया केली आणि अंगलट आली...
सहकार कायद्यांमध्ये बदल करण्याची सुरुवात युतीच्या काळात झाली. परंतु, आपली चरायची कुरण गोत्यात येतील या भीतीनं तत्कालीन विरोधकांनी विरोध केला. पण परत २०१३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारनेच तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्याची तरतूद केली आणि याच तज्ञांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत मतदानाचा अधिकार दिला. याच स्वतःच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या ट्रॅप मध्ये विरोधक अडकले.

Post a Comment

0 Comments