शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदिर परिसरात अधिकृत छायाचित्र सेवा उपक्रम सुरू!




शिर्डी( राजकुमार गडकरी)-
श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरात येणाऱ्या साईभक्तांना त्यांच्या शिर्डी यात्रेतील अविस्मरणीय क्षण डिजिटल स्वरूपात जतन करता यावेत, या उद्देशाने श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत अधिकृत छायाचित्र सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमास संस्थानच्या माननीय तदर्थ समितीने नुकतीच मान्यता दिली होती. त्यानुसार दीपावली निम्मित या सुविधेचा प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत संस्थानच्या अधिकृत छायाचित्रकारांमार्फत संस्थानच्या कॅमेऱ्याद्वारे भाविकांची छायाचित्रे काढण्यात येणार असून, तीन डिजिटल छायाचित्रांसाठी ₹५० इतके देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे..
या सुविधेचा प्रथम लाभ हैद्राबाद येथील मेघना या साईभक्तांनी ₹५० देणगी शुल्क भरून घेतला. अशा प्रकारे त्या या उपक्रमाचे प्रथम लाभार्थी ठरल्या असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर ₹५० देणगी भरून प्राप्त झालेली पावती गेट क्रमांक ३ जवळील अधिकृत छायाचित्र सेवा केंद्रावर दाखविणे आवश्यक आहे. त्यानंतर संस्थानने निश्चित केलेल्या मंदिर परिसरातील ठरावीक छायाचित्र स्थळांवर संस्थानच्या अधिकृत छायाचित्रकारांमार्फत भाविकांची तीन छायाचित्रे संस्थानच्या कॅमेऱ्याद्वारे काढण्यात येतील. ही छायाचित्रे भाविकांना केवळ डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रिंटेड छायाचित्रे दिली जाणार नाहीत.
या सुविधेमुळे भाविकांना मंदिर परिसरातच माफक देणगी शुल्कात अधिकृत छायाचित्र सेवा उपलब्ध होणार असून, त्यांच्या शिर्डी भेटीतील अविस्मरणीय क्षण डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहेत. त्यामुळे भाविकांची शिर्डी यात्रा अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय होण्यास मदत होईल. तसेच भाविकांनी ही छायाचित्रे आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार व सोशल मीडिया माध्यमांवर शेअर केल्यास शिर्डी तीर्थक्षेत्राच्या प्रचार व प्रसारालाही निश्चितच हातभार लागेल.
भाविकांना सुलभ, अधिकृत आणि माफक देणगी शुल्कात छायाचित्र सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थानने हा उपक्रम सुरू केला असून, साईभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments