अंजनगाव सुर्जी येथे २ नोव्हेंबरला बारी समाजाचे प्रलंबित मागण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन-----




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. ०१ -- बारी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या वतीने दि. ०२ नोव्हेंबर सोमवारी अंजनगाव सुर्जी येथे आत्मक्लेश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाचे आराध्य संत श्री रुपलाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारावे, बारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी तसेच समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
संत श्री रुपलाल महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. आर्थिक महामंडळाला भरीव निधी उपलब्ध झाल्यास समाजातील गरजू विद्यार्थी, होतकरू तरुण, बेरोजगार युवक, व्यावसायिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र ढोलप यांनी समाज बांधवांना एकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 'समाजाचा स्वाभिमान, हक्क आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट हाच खरा आधार आहे. समाजासाठी एक दिवस समर्पित करून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याची वेळ आली आहे,' अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष, अकोला सौ कुसुम विजय रेखाते यांनीही महिला जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील माता-भगिनींना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समाजाची प्रगती केवळ पुरुषांच्या सहभागातून शक्य नसून महिलांच्या सक्रिय सहभागामुळेच समाजाला खरी ताकद मिळते. गृहिणी, नोकरदार महिला, शिक्षिका व व्यावसायिक महिलांनी समाजाच्या विकासासाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
'समाजासाठी जगणे ही भावना, समाजासाठी लढणे ही जबाबदारी आणि समाजाच्या हक्कासाठी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,' असा संदेश देत अंजनगाव सुर्जी येथील आंदोलनात समाज बांधवांसह महिला भगिनींनी शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments