दिलीप शिंदे
सोयगाव दि. २२ --- कर्तव्य बजावत असताना जखमी अवस्थेत आढळलेल्या इसमाला तत्काळ मदत करून त्याचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणारे सोयगाव येथील होमगार्ड विलास काशिनाथ भवर यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र (आयपीएस), पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्परपोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत काईगडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. विलास भवर हे सोयगाव पोलीस ठाण्यात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या निदर्शनास एक जखमी इसम आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी इसमाला मदत केली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीही केली. भवर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि तत्परतेमुळे जखमी इसमाला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली. कर्तव्य बजावताना दाखविलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतावादी दृष्टिकोन याबद्दल प्रशंसापत्रात त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. खाकी वर्दीतील पोलिसांना मदत करणाऱ्या होमगार्डच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे कार्य ठरले आहे. भविष्यातही त्यांनी अशाच निष्ठेने आणि तत्परतेने कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल सपोनि दिनकर गोरे, गजानन आरेकर, ज्ञानेश्वर दांडगे, गजानन दांडगे, अजय कोळी, नारायण जिरी, नारायण खोडे, संदीप सुसर, कुणाल जाधव, समाधान बारी, सादिक तडवी तसेच प्रभारी तालुका समादेशक कृष्णा शेवाळकर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, दत्तू रोकडे, कृषी भूषण अरुण सोहनी, आरोग्य धूत दिगंबर वाघ, दिलीप सुरडकर, महेश मानकर, राम सोहनी, अशोक ढगे, भावडू गाडेकर, भगवान कोथलकर आदींनी विलास भवर यांचे अभिनंदन केले.श
0 Comments