दिलीप शिंदे
सोयगाव दि. २३ --- सोयगाव तालुक्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील पाच मतदान केंद्रांवर एकूण १ हजार २५० मतदारांपैकी ८८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अंतिम आकडेवारीनुसार, तालुक्यात ७०.९६ टक्के मतदान झाले. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांच्या बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, सोयगाव शहरातील मतदान केंद्रावर तुटलेली व्हीलचेअर ठेवण्यात आल्याने वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
तालुक्यातील पाच मतदान केंद्रांवर मतदानासाठी प्रशासनाने तयारी केली होती. पदनिर्देशित अधिकारी प्रवीण फुलारी, मनीषा मेने आणि राहुल पत्रिके यांच्या मार्गदर्शनाखाली तीन झोनल अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. झोनल अधिकारी ब्रह्मानंद तायडे, सूर्यकांत निकम आणि गणेश सपकाळ यांनी मतदान प्रक्रियेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली.तालुक्यातील पाच केंद्रांवर १ हजार २५० मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी ७७८ पुरुष आणि १०९ महिला अशा एकूण ८८७ मतदारांनी मतदान केले. पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ७२.१० टक्के, तर महिलांचे प्रमाण ६३.७४ टक्के नोंदविण्यात आले. एकूण मतदान ७०.९६ टक्के झाले. मतदान केंद्रावर सुविधा असूनही उपयोग काय? असा प्रश्न सोयगाव शहरातील बूथ क्रमांक तीनवरील परिस्थितीमुळे उपस्थित झाला. या केंद्रावर ठेवण्यात आलेली व्हीलचेअर तुटलेल्या अवस्थेत असल्याने वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी जाण्यासाठी कसरत करावी लागली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे. या निवडणुकीच्या रिंगणातील ४१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाचही मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी विश्वजीत काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्यासह चार अधिकारी, १३ पोलीस कर्मचारी आणि १० होमगार्ड यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
0 Comments