टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान सेवा सोसायटीच्या सन २०१६/२०१७ व २०१९/२०२० च्या कर्जमाफी योजनेच्या सर्व निकषास पात्र असताना ११२ सभासदांना तत्कालीन सेवा संस्थेचे प्रशासक यांनी जाणून बुजून कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवल्याच्या तक्रारीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश संबधीतांना देत दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोसायटीचे फेर ऑडीट करण्यासाठी शासकीय लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
टाकळीभान सोसायटीच्या ११२ कर्जदार सभासदांनी २०१७/ १७, व २०१९/२० ला झालेल्या कर्जमाफीच्या निकषास पात्र असतानाही लाभापासून कर्जमाफीच्या वंचित ठेवल्याने २०२६/२७ ला जाहीर झालेल्या कर्जमाफीचाही लाभ या शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीत या वंचित शेतकऱ्यांनी पालकमंत्र्याना निवेदन देवून कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी केली होती.
याबाबत टाकळीभानचे माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी आढावा बैठकीत आक्रमकपणे हा मुद्दा मांडला होता. ना. विखे पाटील यांनी याची गंभीर दखल घेत संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले. सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सह. बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क साधून चौकशीचे आदेश देत. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने कर्जमाफीची पोलखोल होणार हे निश्चित झाले होते.
त्यानुसार श्रीरामपूरचे सहाय्यक निबंधक तात्यासाहेब भोसले व सहकार अधिकारी दत्तात्रय वाकचौरे यांनी टाकळीभान सेवा संस्थेला भेट देवून वंचित कर्जदार शेतकरी व संस्थेचे पदाधिकारी यांची बैठक
घेवून चर्चा केली होती व जिल्हा उपनिबंक अ.नगर यांना अहवाल देवून चौकशी कामी शासकीय प्रथम श्रेणी लेखापरीक्षक यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संस्थेचे फेर ऑडीट करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे लवकरच या ११२ शेतकरी मागील दोन्ही कर्जमाफी योजनेतून वंचित का राहीले? जाणुन-बुजून या शेतकऱ्यांना टाळण्यात आले आहे का? याबाबतची सखोल चौकशी होणार असल्याने दोषींवर गुन्हे दाखल होणार का? व वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले,
0 Comments