दिलीप शिंदे
सोयगाव दि. १५--- दुष्काळसदृश परिस्थितीत जनावरांना पुरेसा आणि पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा, तसेच उपलब्ध चाऱ्याचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी पंचायत समिती सोयगावच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत घोसला येथील गंगानंद गोशाळेत पशुपालकांसाठी विविध चारा निर्मिती व प्रक्रिया पद्धतींचे प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्रात पशुपालकांना मुरघास निर्मिती, युरिया प्रक्रिया आणि हायड्रोपोनिक चारा निर्मिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुरघास निर्मितीमुळे चाऱ्याची साठवणूक करून त्याची गुणवत्ता टिकवता येते. युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यास मदत होते. तर हायड्रोपोनिक पद्धतीने कमी पाणी आणि कमी जागेत हिरवा चारा तयार करता येतो. दुष्काळाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांचे पोषण टिकविण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुक्यातील ज्या पशुपालकांकडे पाणी किंवा जलसिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी चारा बियाणे मिळविण्याकरिता मागणी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाशी संपर्क साधून अर्ज भरून द्यावा. या अर्जासाठी २३ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र पशुपालकांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी उत्तम गुट्टे व तालुका पशुसंवर्धन विभाग, सोयगाव यांच्या वतीने केले आहे.
0 Comments