टाकळीभान प्रतिनिधी -बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील आर. जे. पेट्रोल पंपावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा वापरणाऱ्या किरण काढण्या भोसले (रा. कोळगाव) या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कर्जत येथील पोलीस शिपाई इरफान सादीक शेख हे या पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी गेले असता, आरोपी किरण भोसले हा पेट्रोल पंपावरील कामगाराला ५०० रुपयांची खोटी नोट देऊन वाद घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीची अंगझडती घेतली. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या तब्बल ७३ बनावट नोटा आणि एक मोटारसायकल (एमएच १६ बीजी ८८३९) असा एकूण ७६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments