देशमाने येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक इच्छापूर्ती गणेशाचे अंगारकीला हजारो भाविकांनी घेतले दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी)-
येवला शहरापासून पश्चिमेला २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देशमाने या गावातील श्री सिद्धिविनायक इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त गणेश भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. 
  देशमाने येथील येवला- निफाड रस्त्याच्या कडेला भव्य व सुंदर असे पूर्वमुखी श्री सिद्धिविनायक इच्छापूर्ती गणेश मंदिर असून हे नवसाला पावणारे श्री गणेश असल्याची भाविकांची मोठी श्रद्धा आहे. येथे श्री गणेश आपली मनोकामना ,इच्छा पूर्ण करतात. अशी भाविकांची मोठी भावना असून येथे गणेश उत्सवातही भाविकांची मोठी गर्दी होती. तसेच 29 सप्टेंबर 2026 रोजी मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने येथे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

 होती. येथील एका छोट्या चंद्रकोर झालेल्या गोई नदी किनारी व श्री गणेशाला प्रिय अशा शमी झाडाखाली हे श्रींचे पूर्वी छोटे मंदिर होते. ते आता भव्य दिव्य व आकर्षक असे बनवण्यात आले आहे. उजवी सोंड असणाऱ्या इच्छापूर्ती स्वयंभू गणेशाचे हे मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून येथे मोठ्या संख्येने दूर दुरून गणेश भक्त दर्शनाला येत असून मंगळवारी अंगारकीला येथे मोठी गर्दी झाली होती. येथील विश्वस्त ,भक्त, ग्रामस्थ यांनी अंगारकीनिमित्त भाविकांच्या दर्शनाचे व गर्दीचे सुव्यवस्थित नियोजन केले होते.
देशमाने येथील नवसाला पावणार्‍या या सिद्धिविनायकाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे पाच वाजेपासूनच शेकडो भाविक भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती.गणेश उत्सव पर्वकाळात मंदिर व परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. या मंदिरा बाबत एक आख्यायिका सांगितली जाते.
सन १८२३ मध्ये देशमाने येथील गोई नदीला महापूर आला होता. याच वेळी या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात ही पुरातन गणेश मूर्ती वाहून आल्याचे व सन १८२३ मध्ये पेशव्यांनी या महापुरात वाहून आलेल्या गणपती मूर्तीची या गोई नदीकाठी स्थापना केल्याचे बोलले जाते. त्यानंतर येथील जहागीरदारांनी त्यावेळी केलेल्या नवसपूर्तीचा प्रत्यय आल्याने सन १८२७ मध्ये त्यांनी या श्री गणेशा साठी या नदी किनारी छोटीसे देऊळ बांधून या श्रींच्या मूर्तीची देखभाल आणि पूजा विधीची जबाबदारी गावातील नागरिकांवर सोपवली होती.या छोट्या देऊळाची पडझड झाल्याने सन १९५३ मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत गाव वर्गणीतून पुन्हा येथे छोटे मंदिर बांधले होते. असे सांगितले जाते.
दरम्यान येथे सिद्धिविनायक इच्छापूर्ती गणपती मंदिर देखभाल दुरुस्तीसाठी मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यात आले.व नंतर येथे सन २०१४ मध्ये लोक सहभाग आणि भाविकांच्या वर्गणीतून पुन्हा या भव्य दिव्य व सुंदर अशा मंदिराच्या कामास सुरुवात केल्यानंतर तीन वर्षात हे भव्य व आकर्षक अशा मंदिराचे काम पूर्ण झाले.
अलीकडच्या काळात या मंदिराला अनन्य असे महत्त्व प्राप्त झाले असून भाविकांची गर्दी वाढत चालली आहे.भाविकांनी केलेल्या मनोकामना, नवस पूर्ण होऊ लागल्याने या इच्छापूर्ती सिद्धिविनायकास नवसाला पावणारा गणपती, श्री इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले. महिन्यातील प्रत्येक चतुर्थीला हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लिन होत असतात. अंगारकी संकष्ट चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते.या मंदिरात सकाळ-सायंकाळ पूजा-आरती केली जाते. समस्त ग्रामस्थ देशमाने यांच्या वतीने व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून गणेश उत्सव आणि गणेश जयंती सोहळा साजरा केला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थीला येथे दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून जणू येथे यात्रा भरली आहे. अंगारकीला दिवसभरात हजारो गणेश भक्तांनी येथे येऊन दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments