दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव मार्गदर्शनाखाली सिल्लोड पोलीस उपविभागामध्ये सार्वजनिक सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या साऊंड सिस्टीम, लेझर लाईट्स व शार्पीजचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
या महिन्यात पोळा, गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले होते. तसेच, वाहनांच्या मूळ रचनेत अनधिकृत बदल करून मोठ्या साऊंड सिस्टीम बसविणे, वाहनाच्या बाहेरील बाजूस आलेले लोखंडी सांगाडे व ध्वनी उपकरणे वापरणे, तसेच डोळ्यांना इजा होण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या लेझर लाईट्स व शार्पीजचा वापर टाळण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत काइंगडे यांनी बनोटी, सोयगाव, फर्दापूर, घाटनांद्रा, अंभई, भराडी, शिवना, अजिंठा, सिल्लोड आदी विविध गावांमध्ये व शहरांमध्ये गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेऊन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे, उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये व शहरांमध्ये गणेश मंडळांच्या बैठका घेऊन ध्वनी प्रदूषण टाळणे, कायद्याचे पालन करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते.पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला बहुतांश गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नियमांचे पालन करून शांततेत व उत्साहात सण-उत्सव साजरे करण्यात मंडळांनी सहकार्य केले. मात्र, काही मंडळांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे आणि सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीनकर गोरे आदींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.येणाऱ्या सण उत्सव काळात मंडळानी सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी केले आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात येईल असे सपोनी दिनकर गोरे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments