श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमास प्रारंभ!




शिर्डी( प्रतिनिधी)-
श्री साईचरित्र या पवित्र ग्रंथामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठणाचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. या स्तोत्राच्या नियमित जपाने मनःशांती, आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वरकृपा प्राप्त होते, असे सांगितले गेले आहे. या आध्यात्मिक परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट तर्फे साईभक्तांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
श्री साईबाबा समाधी मंदिर येथे दररोज सकाळी ६.०० वाजता श्रींच्या मंगलस्नानानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे ध्वनिमुद्रित (रेकॉर्डिंग) पठण प्रसारित केले जाते. या उपक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून उपस्थित साईभक्तांना सामूहिक नामस्मरणाचा लाभ मिळत आहे.
संस्थानामार्फत पूर्वीपासूनच विष्णू सहस्रनाम स्तोत्र या पोथीचे प्रकाशन करण्यात आले असून, ती पोथी साईभक्तांना अत्यंत अल्प दरात प्रकाशन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक साईभक्त या पोथीच्या माध्यमातून घरी तसेच मंदिरात नियमित पठण करीत आहेत.
या आध्यात्मिक परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी संस्थानने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. श्री साईबाबा संस्‍‍थानचे साईनाथ मंगल कार्यालय (पहिला मजला) येथे दि. १९ फेब्रुवारी २०२६ पासून दररोज सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत सामुदायिक विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या सामुदायिक पठणामध्ये साईभक्तांना सक्रिय सहभाग घेता येणार असून इच्छुक साईभक्त नियमितपणे सहभागी होऊ शकतील.
या उपक्रमामुळे भक्तांमध्ये एकात्मता, श्रद्धा आणि सामूहिक साधनेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व साईभक्तांना या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन विष्णू सहस्रनामाच्या जपातून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments