दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३- वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ हे अजगर हत्या प्रकरणात कारवाई करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याकडे भाजपा जिल्हा चिटणीस सुनील गावंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात सुवर्णा माने यांची भेट घेऊन ही मागणी केली.
दरम्यान सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात शेळी गिळंकृत केलेल्या अजगराची ठेचून हत्या करून त्याच्या पोटातून मृत शेळी बाहेर काढल्या चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओ बाबत वनविभागाने गुन्हा दाखल केला असून अद्यापही मिसाळ यांनी संबंधित गुन्हेगारांना अटक केलेली नाही. वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित गुन्हेगार व वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुवर्णा माने उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांची भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, जयप्रकाश चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक सुवर्णा माने या वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्यावर कारवाई करतात की पाठराखण हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments