डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील खरीप नुकसानीची केली पाहणी



लोणी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी बुद्रुक, हणमंतगाव व पाथरे या भागातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

पिकांच्या नुकसानीचा आढावा घेताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, मका यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी व मागण्यांचा वेगाने निपटारा व्हावा यासाठी शासनाने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया सध्या सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांची कामेही लवकर पूर्ण होतील. त्यानंतर मदत जाहीर करताना राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, अद्याप पावसाचे सावट असल्यामुळे पूर्ण नुकसानीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

डॉ. विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. आवश्यक असल्यास मोठ्या गावांमध्ये व अडचणीच्या ठिकाणी ड्रोन सर्व्हे करून पंचनामे करावेत, जेणेकरून एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागू नये. पंचनाम्यासाठी वेळ निश्चित करून त्याची पूर्वसूचना शेतकऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.

याशिवाय भविष्यात पावसाचे पाणी शेतांमध्ये साचू नये यासाठी शेतलगत असलेल्या चाऱ्यांचे रुंदीकरण करण्याची तातडीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंचन विभागाने याबाबत आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments