"विद्यार्थ्यांच्या हातून घडली स्वच्छतेची क्रांती — न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीरची प्लास्टिकमुक्ती

राजकुमार गडकरी 

शिर्डी( प्रतिनिधी) राहता तालुक्यातील सावळी विहीर येथे  "प्लास्टिक मुक्त भारत" या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत 13 ऑगस्ट 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल, सावळीविहीर येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावाच्या स्वच्छतेसाठी कौतुकास्पद पुढाकार घेतला. गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राहाता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनी मिळून परिसरातील कचरा वेचणे, प्लास्टिक वेगळे करणे, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, तसेच “Deep Cleaning” उपक्रम उत्साहात पार पाडला. यावेळी गावातील गल्लीबोळ, शाळा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे नव्याने उजळून निघाली.
विद्यार्थ्यांनी हातात जनजागृती फलक, घोषवाक्ये घेऊन "प्लास्टिक मुक्त गाव – आपला संकल्प" असा संदेश सर्वत्र पोहोचवला. लहान नाटिकांमधून प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि त्यावरचे उपाय ग्रामस्थांपर्यंत पोचवण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक श्री. म्हस्के सर आणि श्री. खान सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देऊन स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व शिक्षकवर्गाच्या सक्रिय सहभागामुळे मोहिम यशस्वी ठरली.गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक केले आणि पुढील काळातही अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments