दिलीप शिंदे
सोयगाव दि.११ - एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वरिष्ठ सहाय्यक पदावर असलेल्या कर्मचाऱ्याचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटला असून देखील संबंधित कर्मचाऱ्यास निवृत्तीचे हक्काचे लाभ मिळत नसल्याने दि.१५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेले राजेंद्र विक्रम पाटील हे दि.३० जून २०२४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. मात्र, सेवानिवृत्तीनंतर तब्बल १३ महिने उलटूनही निवृत्तीचे हक्काचे लाभ मिळत नसल्याने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे निवृत्त कर्मचारी आमरण उपोषण करणार असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याने चार वेळा तात्पुरत्या निवृत्ती वेतनासाठी अर्ज केले असून प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांना आर्थिक व कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँक कर्जाचे हप्ते थकले असून आरोग्यविषयक उपचारही रखडले आहेत.या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील संबंधित अधिकारी, लोकायुक्त व उप-लोकायुक्त मुंबई यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे, असा आरोप पाटील यांनी केला.सेवानिवृत्ती नंतरही हक्काचे लाभ मिळत नसल्याने ही कर्मचाऱ्यांची उपेक्षा आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निवृत्ती लाभ देण्यात यावे, अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद समोर दि.१५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यास न्याय मिळेल किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments