महात्मा गांधी संकुलात ग्रंथदिंडी उत्साहात



लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात आषाढी एकादशीनिमित्त नुकतेच दिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका  नलिनी जाधव, डॉ. शरद दुधाट आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दुधाट यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, वारी हे सामाजिक एकतेचे प्रतिक असून या सोहळ्यातून अंत:करणाच्या शुद्धीसोबत शुद्ध निरपेक्षपणे जीवन जगण्याची उर्मी मिळते. दिंडी हे मनुष्य जीवनाची आत्मशुद्धी, सेवा, त्याग आणि परमार्थ आहे. याप्रसंगी प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आषाढी दिंडीचे महात्म्य विशद केले.
 विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आषाढी दिंडीमध्ये व ग्रंथदिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडी सोहळा आयोजनामध्ये अश्विनी सोहोनी, संगीता उगले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments