श्रीक्षेत्र रुई येथे मंगळवार दि. 29 जुलै ते बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 या कालावधीत 132 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

शिर्डी( राजकुमार गडकरी)राहाता तालुक्यातील रुई येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 132 वा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंगळवार दिनांक 29/ 7/2025 ते बुधवार दिनांक 6/ 8 /2025 या कालावधीत होणार आहे. 
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र रुई येथे श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सन 1894 साली घालून दिलेल्या संकेतानुसार हा प्रसिद्ध व मोठी परंपरा असणारा हरिनाम सप्ताह येथे होत असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या 132 व्या अखंड हरिनाम सप्ताहचा प्रारंभ मंगल कलश स्थापना, पंचदीप प्रज्वलन व ग्रंथ विना टाळ आणि मृदंग पूजन कोपरगाव बेटातील सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती पण.पू. रमेशगिरीजी महाराज तसेच शिर्डी येथील श्री ज्ञानेश्वर आश्रमाचे महंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर काशीकानंद महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. नंतर दररोज मंगळवार दिनांक 29 /7 /2025 ते बुधवार दिनांक 6 /8 /2025 या कालावधीत सकाळी साडेचार ते सहा या कालावधीत ह भ प बापू महाराज बीड  व रुई येथील भजनी मंडळी यांच्याकडून काकडा आरती होणार आहे. त्यानंतर सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी साडेअकरा ते बारा गाथा भजन ,नंतर दुपारी वारकरी नियम भजन, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ, व रात्री नऊ ते 11 या दरम्यान सुश्राव्य असे किर्तन होणार आहे. हरिपाठ व किर्तन साथ  हभप संतोष महाराज दीक्षित यांची राहणार आहे. श्रीक्षेत्र रुई येथे या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त मंगळवार 29/ 7/ 2025 रोजी रात्री नऊ ते 11 या दरम्यान ह भ प हेमलताताई पिंगळे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर बुधवार दिनांक 30/ 7/ 2025 रोजी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजय महाराज जगताप भऊरकर यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवार 31 /7/ 2025 रोजी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होणार असून शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी ह भ प गोरक्षनाथ महाराज देठे यांचे कीर्तन होणार आहे तर शनिवार दिनांक 2 /8/ 2025 रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी नेहमीप्रमाणे रात्री नऊ ते 11 या दरम्यान ह भ प श्रीकांत महाराज साखरे तर सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी भागवताचार्य हभप विठ्ठलपंत गोंडे यांचे जाहीरहरी किर्तन होणार आहे .तसेच मंगळवार पाच ऑगस्ट रोजी ह भ प नित्यानंदगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी हभप पांडुरंग महाराज गिरी यांचे सकाळी दहा ते बारा या कालावधीत काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. व या दिवशी रात्री नऊ वाजता विनोदाचार्य ह भ प गोविंद महाराज गायकवाड यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह काळात कीर्तनासाठी मृदंगाचार्य म्हणून हभप संतोष महाराज दीक्षित व नितीन महाराज हरकड, गायनाचार्य म्हणून ह भ प रामकृष्ण महाराज चौधरी व नकुल महाराज जाधव, चोपदार म्हणून हभप भिकाजी शंकरराव वाबळे, रमेश लक्ष्मणराव कामठे आदींचे सहकार्य राहणार आहे. शनिवार दोन ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ ते 11 या दरम्यान श्रीक्षेत्र देवगडच्या भास्करगिरीजी महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद सोहळा राहणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीक्षेत्र रुई येथील हरिनाम सप्ताह कमिटी, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ ,भाविक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments