शिर्डीत साई संस्थानच्या वतीने 22 जून पासून ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू! शिफारस प्राप्त मान्यवरांच्या दर्शन वेळा ठरल्या! मात्र सशुल्क पास दर्शन व मोफत दर्शन पूर्वीप्रमाणेच होणार!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील
 श्री साईबाबा संस्थान  मा. तदर्थ समिती  निर्णयानुसार, २२ जुन २०२५ पासून ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भाविकांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार व वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मंदिरातील दर्शन प्रक्रियेला अधिक सुलभ, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
 सध्या जनसंपर्क विभागाकडे संपूर्ण दिवसभरात विविध शासकीय विभाग, अधिकारी , पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी विश्वस्त आणि इतर शिफारसीद्वारे ‘प्रोटोकॉल दर्शन’ व्यवस्था मागणी केली जाते. मात्र अशा शिफारसीमुळे सामान्य रांगेतून येणाऱ्या भक्तांच्या दर्शनात अडथळा निर्माण होतो आणि सुरक्षा, पोलीस तसेच जनसंपर्क विभागावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. यावर उपाय म्हणून, आता शिफारस प्राप्त मान्यवरांचे दर्शन केवळ खालील ‘ब्रेक दर्शन’ वेळांमध्येच होणार आहे,
ब्रेक दर्शन वेळापत्रक
सकाळी : ०९.०० ते १०.००
दुपारी : ०२.३० ते ०३.३०
रात्री : ०८.०० ते ०८.३०
ब्रेक दर्शनसाठी अनिवार्य प्रक्रिया
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकृत प्रतिनिधींनी संस्थानच्या जनसंपर्क विभागाकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.अशा नोंदणीकृत साईभक्तांनी ब्रेक दर्शन वेळेच्‍या अर्धा तास अगोदर संस्थान जनसंपर्क विभागात उपस्थित राहून सशुल्क पास प्राप्त करणे बंधनकारक असेल. सदर पासधारक साईभक्तांना केवळ जनसंपर्क विभागामार्फत निश्चित वेळेतच ब्रेक दर्शनाची सुविधा दिली जाईल.
सर्वसामान्य भाविकांसाठी पूर्ववत व्यवस्था कायम आहे.
गेट क्र. ६ (सशुल्क दर्शन) व गेट क्र. ७ (मोफत दर्शन) ही दर्शन व्‍यवस्‍था पुर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. यासह शिर्डी व पंचक्रोशीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्‍यक्‍ती, गर्भवती महिला, नवजात बालकांसह कुटुंबीयांसाठी निश्चित असलेले विशेष प्रवेशमार्ग पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.
प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत भारतीय गणराज्याचे आजी माजी मा. राष्ट्रपती, मा.उप राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा.उप पंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष/उपाध्‍यक्ष, केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, महाराष्ट्र राज्य विधानसभा/ विधानपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍याचे आमदार, खासदार, महाराष्ट्र राज्यासह विविध राज्‍यातील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर सर्व न्यायाधीश, प्रसिध्‍द उद्योगपती, आंतरराष्‍ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्‍त्रज्ञ, मा.व्‍यवस्‍थापन / मा.तदर्थ समितीचे आजी माजी अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व सदस्‍य आदि महत्वाच्या व्यक्तीं तसेच एक लक्ष रुपयांचे वरील देणगीदार साईभक्‍त यांना प्रोटोकॉल अंतर्गत दर्शन सुविधा यथावत सुरु राहील. 
श्री साईबाबा संस्थानकडून भाविकांच्या हितासाठी नेहमीच सुसूत्र, पारदर्शक व शिस्तबद्ध सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. 'ब्रेक दर्शन' व्यवस्थेमुळे, मंदिर प्रशासनावरचा तसेच तालुकास्‍तरीय इतर शासकिय यंत्रणांचा देखील ताण कमी होणार असून, सर्वसामान्य साईभक्तांना अडथळारहित व समाधानकारक दर्शन अनुभवता येईल, असा विश्वास संस्थान प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments