टाकळीभान प्रतिनिधी- एअरटेल कंपनीचे सुरू असलेले अनाधिकृत खोदकाम मयूर पटारे यांनी बंद पाडले; कंपनीवर कारवाई करा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन.
टाकळीभान येथे बँक ऑफ महाराष्ट्र पासून ते महादेव मंदिराच्या कमानी पर्यंत एअरटेल कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे खोदकाम सुरू केले असल्याचे समजताच बाजार समितीचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे यांनी सदर कामास विरोध करत बंद पाडले.
यावेळी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी धाव घेत संचालक पटारे यांनी जाब विचारला असता आधी ठेकेदार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी घेतली असल्याचे सांगितले. परंतु सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे पटारे यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मात्र ठेकेदाराची तारांबळ उडाली.
मयुर पटारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब वराळे, सहाय्यक अभियंता धनंजय सोनवणे, शाखा अभियंता निलेश आसने यांच्याशी संपर्क साधला असता कुठल्याही प्रकारची परवानगी सदर कंपनीला देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी मयुर पटारे यांनी ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली. कारवाई न केल्यास ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल अशा इशारा यावेळी पटारे यांनी दिला.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments